चौथी कसोटी: चेतेश्वर पुजाराचे शानदार शतक; टीम इंडियाने पहिल्या डावात घेतली आघाडी

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात 27 धावांनी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी भारताकडून चेतेश्वर पुजाराने शतक करत तर इंग्लंडकडून मोईन अलीने 5 विकेट्स घेऊन हा दिवस गाजवला.

दुसरा दिवस संपण्यासाठी काही वेळ बाकी असताना इंग्लंडचा दुसरा डाव सुरु झाला. त्यामुळे इंग्लंडने संथ सुरुवात करत एकही विकेट दिवसाखेर गमावली नाही. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक 2 आणि केटन जेनिंग्ज 4 धावांवर नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी भारताने दुसऱ्या दिवशी बिनबाद 19 धावांपासून खेळायला सुरुवात केली परंतू भारताचे सलामीवीर फलंदाज केएल राहुल(19) आणि शिखर धवनने(23) लवकर विकेट गमावली. या दोघांनाही स्टुअर्ट ब्रॉ़डने बाद केले.

या दोन विकेट्सनंतर भारताचा डाव चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची अर्धशतकी भागिदारी रचली. मात्र ही जोडी तोडण्यात इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करनला यश आले.

त्याने खेळपट्टीवर स्थिर झालेल्या विराटला 46 धावांवर असताना बाद केले. यानंतर काही वेळातच अजिंक्य रहाणेही 11 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ काही वेळात युवा खेळाडू रिषभ पंतनेही विकेट गमावली. पंत 29 चेंडू खेळल्यानंतरही शून्य धावेवर बाद झाला.

यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या(4), आर अश्विन(1) आणि मोहम्मद शमीही(0) लगेच बाद झाले. त्यामुळे भारताची आवस्था 8 बाद 195 अशी झाली.

मात्र त्यानंतर पुजाराने इशांत शर्मा(14) आणि जसप्रीत बुमराहला(6) साथीला घेत 78 धावांची भर घातली. पुजाराने शेवटपर्यंत लढत देत शतक केले. त्याने इशांतबरोबर नवव्या विकेट्ससाठी 32 धावांची तर बुमराहबरोबर शेवटच्या विकेटसाठी 46 धावांची भागिदारी रचली. अखेर ब्रॉडने बुमराहला बाद करत भारताचा डाव 273 धावांवर संपुष्टात आणला.

पुजाराने इंग्लंडमधील पहिले शतक करताना 257 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार मारले.

इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 63 धावात 5 विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजापैकी सॅम करन(1/41), स्टुअर्ट ब्रॉड(3/63) आणि बेन स्टोक्सने (1/23) विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक-

इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 246 धावा

भारत पहिला डाव – सर्वबाद 273 धावा

इंग्लंड दुसरा डाव – बिनबाद 6 धावा

(अॅलिस्टर कूक (2*) आणि केटन जेनिंग्ज(4*) नाबाद खेळत आहेत.)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?