एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का

दुबई। 14 व्या एशिया कपमध्ये आज (19 सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापत ग्रस्त झाला आहे. त्याला या सामन्यादरम्यान स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले आहे.

ही घटना सामन्याच्या पहिल्या डावात हार्दिक 18 वे षटक टाकत असताना घडली. यावेळी पाकिस्तानचे बाबर आझम आणि शोएब मलिक फलंदाजी करत होते. हार्दिक या षटकातील पाचवा चेंडू टाकत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.

यानंतर भारताचे वैद्यकीय स्टाफ मैदानावर आले आणि त्यांनी हार्दिकला तपासले. पण त्यानंतर त्याच्यासाठी स्ट्रेचर मागवून त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. या दरम्यान त्याने पाठीला खूप वेळ धरुन ठेवले होते, त्यामुळे त्याला क्रॅम्प किंवा पाठीची दुखापत झाली असल्याची शक्यता आहे.

हे हार्दिकचे पाचवे षटक होते. हार्दिकचे उर्विरित षटक अंबाती रायडूने पूर्ण केले.

हार्दिकने या सामन्यात आधी शोएब मलिकला बाद करण्याचा प्रयत्नही केला होता पण त्यावेळी एमएस धोनीने त्याचा झेल सोडला होता.

हार्दिकची दुखापत कोणती आहे किंवा किती गंभीर दुखापत आहे याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या उर्वरित सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात अडखळत झाली आहे. त्यांनी सुरुवातीच्या पाच षटकातच फकार जामन आणि इमाम उल हक या सलामीवीरांची विकेट गमावली होती. या दोघांनाही भुवनेश्वर कुमारने बाद केले.

पण त्यानंतर मलिक आणि बाबरने 82 धावांची भागीदारी रचली. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि असीफ अलीने लवकर विकेट गमावल्या. पाकिस्तानने 32 षटकात 6 बाद 119 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट

एशिया कप २०१८: शिखर धवनचा विक्रमांचा सिलसिला सुरूच

एशिया कप २०१८: केवळ 16 तासात टीम इंडिया खेळणार दुसरा आंतरराष्ट्रीय सामना