एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान

दुबई। आज(23 सप्टेंबर) एशिया कप 2018 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोरचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून विजयाची लय कायम ठेवण्याची दोन्ही संघांना संधी असून अंतिम फेरीत प्रवेशासाठी प्रबळ दावेदार बनण्याची संधी आहे.

या सामन्याआधी सुपर फोरमध्ये भारताने बांगलादेशचा 8 विकेट्सने सहज पराभव केला आहे तर पाकिस्तानला मात्र आफगाणिस्थान विरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. अखेर त्यांनी रोमहर्षक झालेल्या या सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला होता.

तसेच या स्पर्धेत साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान हे आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला होता.

पण अनपेक्षित निकाल लावण्याची पाकिस्तान संघात क्षमता आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना आणि वरच्या फळीतील फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असणार आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक चांगल्या लयीत खेळत असून भारताला त्याला रोखण्यासाठी योग्य योजना आखाव्या लागणार आहे. त्याचबरोबर त्यांचे वरच्या फळीतील फलंदाज बाबर आझम, इमाम उल हक आणि फकार जामनही भारतासाठी धोकादायक ठरु शकतात.

वेगवान गोलंदाजी हे पाकिस्तानचे प्रमुख अस्र असणार आहे. त्यात मोहम्मद आमीर आणि हसन अली हे वेगवान गोलंदाज महत्वाची भूमिका बजावू शकतात.

तसेच भारतीय संघही समतोल राखून आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघासमोरही भारताचे तगडे आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध खेळलेला 11 जणांचा भारतीय संघच कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघातील दोन्ही सलामीवीर फलंदाज हे फॉर्ममध्ये आहेत. भारताचा प्रभारी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मागील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत.

तर शिखर धवननेही चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव हे खेळाडू कायम राहतील.

त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजालाच संधी मिळू शकते. त्याने बांगलादेश विरुद्ध 29 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो त्या सामन्यात सामनावीरही ठरला होता. हा सामना त्याचा एकवर्षांनंतरचा पहिला वनडे सामना होता.

तसेच त्या सामन्यात त्याला दुखापत ग्रस्त झालेल्या हार्दिक पंड्याच्या ऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. त्यानेही संधी न दवडता चांगली कामगिरी केली.

सुपर फोर मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज, तर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंना 11 जणांच्या भारतीय संघात खेळवण्याची दाट शक्यता आहे.

या सामन्यासाठी बनवण्यात आलेली खेळपट्टीही फलंदाजीसाठी पोषक असली तरी फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळेल. जो संघ नाणेफक जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान हे संघ वनडेमध्ये आत्तापर्यंत 130 वेळा आमने सामने आले असून यात भारताने 53 सामन्यात बाजी मारली आहे तर पाकिस्तानने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 4 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.

याबरोबरच हे दोन संघ एशिया कपमध्ये वनडेत 12 वेळा आमने सामने आले आहेत. यात भारताने 6 आणि पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. तसेच  1 सामना अनिर्णित राहिला आहे

तसेच 2016 ला टी20 प्रकारात खेळलेल्या एशिया कपमध्ये या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

भारत आणि पाकिस्तान सामन्याच्यावेळी अबुधाबीमध्ये बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातही सुपर फोरमधील दुसरा सामना रंगणार आहे.

एशिया कप 2018: सुपर फोरमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सर्वकाही-

भारत विरुद्ध पाकिस्तान कधी होणार आहे सुपर फोरमधील सामना?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना 23 सप्टेंबर 2018 ला होणार आहे.

कोठे होईल भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोरमधील सामना?

भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोरमधील सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोरमधील सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5.00 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामन्याला सुरुवात होईल. तर 4.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स 1,  स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट, स्टार स्पोर्ट्स 1 सिलेक्ट एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी 1 एचडी  या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना पाहता येणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर फोरमधील सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 11 जणांचा संघ:

भारत:रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन(उपकर्णधार), केएल राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, दिपक चहर, रविंद्र जडेजा.

पाकिस्तान: सर्फराज अहमद (कर्णधार), फकार जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, शान मसूद, शोएब मलिक, हरीस सोहेल, शदाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान खान, शाहीन अफ्रिदी, आसिफ अली , मोहम्मद अमीर.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा

पाकिस्तानच्या या माजी दिग्गज गोलंदाजने एमएस धोनीशी केली शोएब मलिकची तुलना

हिटमॅन रोहित शर्मा या कारणामुळे पाकिस्तान विरुद्ध ठरणार हिट

टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय