कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेला भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीने उद्यापासून सुरुवात

-अनिल भोईर

आंतराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने उद्यापासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील वर्षी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप नंतर ही पहिलीच कबड्डीची आंतराष्ट्रीय स्पर्धा होत आहे.

उद्या अर्थात शुक्रवारपासून दुबई येथे कबड्डी मास्टर्स २०१८ यास्पर्धेला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग असून त्यामध्ये भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया हे ४ संघ आशिया खंडातील आहेत तर अर्जेन्टिना व केनिया हे २ संघ आशिया बाहेरील देश आहेत.

दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धेते सुरुवातीला साखळी सामने खेळवले जाणार असून त्यासाठी सहा संघाची दोन गटात विभागणी केली आहे. पहिल्या गटात भारत, पाकिस्तान व केनिया हे संघ आहेत, तर दुसऱ्या गटात इराण, दक्षिण कोरिया व अर्जेन्टिना हे देश आहेत. साखळी सामन्यानंतर सेमी फायनल व फायनल असे सामने खेळवले जातील.

क्रिकेट, हॉकी प्रमाणेच कबड्डीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच क्रीडा रसिकांना असते. उद्या कबड्डी मास्टर्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार असून खूप दिवसांनी पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये लढत होत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमध्ये भारतीय संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. मागील पाच सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला हारवले आहे. मागील लढत गोरेगाव इराण येथे झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात झाली होती. अंतिम सामन्यात भारताने ३६-२२ असा पाकिस्तानचा पराभव करत चॅम्पियनशिप जिंकली होती.

कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत: गिरीश मारुती एर्नाक, सुरेंद्र नाडा, संदीप, मोहित चिल्लर, राजू लाल चौधरी, सुरजित, दीपक हुडा, परदीप नरवाल, राहुल चौधरी, रिशांक देवाडिगा, मोनू गोयत, रोहित कुमार, अजय ठाकूर, मनजीत चिल्लर

पाकिस्तान: नासीर अली, वकार अली, मुदस्सर अली, कासीर अब्बास, काशिफ रजाक, मोहम्मद नदीम, सज्जाद शौकत, मुहम्मद इमरान, मोहम्मद सफियन, आबिद हुसैन, अखिल हुसैन, वासिम सज्जद, मुहम्मद निसार, मुजम्मल हुसेन.

थेट प्रेक्षपणं: स्टार स्पोर्ट्स वर रात्री ०८ वाजता.

भारत विरुद्ध पाकिस्तान मागील पाच लढतीचे निकाल:
१) आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०१७, इराण
(अंतिम सामना २६ नोव्हेंबर २०१७)
भारत ३६-२२ पाकिस्तान
२) आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०१७, इराण
(साखळी सामना २५ नोव्हेंबर २०१७)
भारत ४४-१७ पाकिस्तान
३) दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा २०१६, भारत
(अंतिम सामना १३ फेब्रुवारी २०१६)
भारत ०९-०८ पाकिस्तान
४) दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धा २०१६, भारत
(साखळी सामना १३ फेब्रुवारी २०१६)
भारत १०-०९ पाकिस्तान
५) आशियाई क्रीडास्पर्धा २०१४, दक्षिण कोरिया
(साखळी सामना ३० सप्टेंबर २०१४)
भारत २३-११ पाकिस्तान

महत्वाच्या बातम्या-

माजी भारतीय कबड्डीपटूचे स्वप्न उतरले सत्यात!

भारतीय कबड्डी संघाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण!

कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये टीम इंडियात तब्बल ४ करोडपती खेळाडूंचा समावेश