रहाणेची २०१७मधील कामगिरी खराबच! शास्त्री सरांचा पुन्हा जुनाच पाढा!

डर्बन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात भारताला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या चांगल्या खेळीमुळे विजय मिळवता आला. यामुळे विराटबरोबरच अजिंक्य रहाणेचे सर्वच स्थरातून जोरदार कौतुक होत आहे.

रहाणेला पहिल्या दोन कसोटी सामन्यात संधी न देण्याबद्दल विचारले असता मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जुन्याच गोष्टीवर जोर दिला आहे.

“दौऱ्याच्या अगदी सुरुवातीपासून संघ व्यवस्थापनाला रोहित शर्माला संधी द्यायची होती. कारण रोहित शर्मा हा फॉर्ममध्ये होता तर अजिंक्य रहाणेला धावा जमवणे अवघड जात होते. तो खेळपट्टीवर सोडा नेटमध्ये सराव करतानाही अडचणी येत होत्या. रोहितची सरासरी २००च्या वर २०१७मध्ये होती शिवाय वनडेत त्याने १२०० धावा या काळात केल्या होत्या. संघ व्यवस्थापनाने रोहितला काय सांगायला हवे होते?” असे शास्त्री म्हणाले.

“अजिंक्य रहाणे हा एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे परंतु दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याची सरासरी ही ३० होती. त्यामुळे या काळात झालेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही. लोकांना खूप काही बोलायचं होत परंतु आता ते लोक कुठे गेले आहेत. ” असेही ते पुढे म्हणाले.

तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेने संघाच्या विजयात महत्वपूर्ण जबाबदारी पार पडताना मिळालेल्या संधीचे सोने केले. तसेच कालच्या सामन्यातही त्याने ७९ धावांची चांगली खेळी केली.