एकाचवेळी दोन खेळाडू करतायत भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व!

डर्बन । भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिका संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात कर्णधार कोहली, युझवेन्द्र चहल आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू चांगलेच चमकले.

परंतु या सामन्यातही एमएस धोनी या खेळाडूची जोरदार चर्चा झाली. याचे कारण म्हणजे धोनी गेला संपूर्ण महिना क्रिकेटपासून दूर होता परंतु त्याच्या संघात परत येण्यामुळे संघात आलेलं नवचैतन्य.

या सामन्यात जेव्हा दक्षिण आफ्रिका फलंदाजी करत होता तेव्हा धोनी सतत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यात बदल करताना दिसला. तसेच नवीन गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसला.

धोनी हा वनडे संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याने ३१३ वनडे सामने खेळले आहेत. याचाच फायदा अनेकवेळा संघाला होतो.

याबाबद्दल बोलताना कुलदीप यादव काल पत्रकार परिषदेत म्हणाला, ” जेव्हा तुमच्याकडे दोन महान खेळाडू असतात. त्यातही एक संघाचा नायक असतो तर दुसऱ्याने आधी नेतृत्व केलेलं असत अशा वेळी तुमचा यष्टीरक्षक (धोनी) तुमच्या फिरकी गोलंदाजांचं ५०% काम करतो. धोनी भाई खूप खेळल्यामुळे ते फलंदाज काय करणार आहे हे लगेच समजतात. “

“आम्ही अजून तरुण आहोत. आम्हाला अनुभव नाही. परंतु धोनी भाई सतत मार्गदर्शन करत असतात. कधी कसा चेंडू टाकावा हे ते सांगतात. त्यामुळे आम्ही गोलंदाजीवर लक्ष देतो. बाकी काम माही भाई आणि विराट भाई करतात. ” असेही कुलदीप पुढे म्हणाला.

Video: