९७ वर खेळत असताना विराटने शास्त्रींना डाव घोषित करू का असे विचारले होते !

कोलकाता । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके करणारा केवळ ८वा खेळाडू बनल्यामुळे आणि एकंदरीतच जबदस्त कामगिरीमुळे सर्वच्या चर्चेचा पुन्हा एकदा विषय झालेला कोहली हा अनेक गोष्टींनी कौतुकाचा विषय ठरत आहे.

कुणी त्याची सचिनशी तुलना करत आहे तर स्काय इज द लिमिट असे विराटला कुणी म्हणत आहे. परंतु काल बीसीसीआयच्या सोशल मिडीयावर शास्त्री आणि विराट यांच्या हातवारे करून संभाषण साधण्याचा विडिओ व्हायरल झाला आणि चर्चा झाली की नक्की ते काय बोलत होते याची.

जेव्हा विराट ९७ धावांवर खेळत होता तेव्हा प्रशिक्षक शास्त्री यांना त्याने विचारले की मी दुसरा डाव घोषित करू का? त्यावेळी शास्त्री यांनी आपल्या या लाडक्या खेळाडूला आणखी एक षटक खेळायचा सल्ला दिला. तसेच त्याने शतक करून माघारी यावे असे सुचवले.

यावेळी विराटने स्वतःच्या विक्रमापेक्षा संघ हिताला प्राधान्य दिल्याचे समोर आले. तसेच हा खेळाडू जेव्हाही शतक करतो तेव्हा नेहमी सांगतो की शतकापेक्षा संघाला विजय मिळवून देण्यात मला जास्त आनंद मिळतो आणि विराटने काल हेच आपल्या कृतीतून दाखवून दिले.