श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यांच्या वेळेत बदल 

बीसीसीआयने आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांच्या बदललेल्या वेळा जाहीर केल्या. ही मालिका पुढील महिन्यात १० तारखेपासून सुरु होणार आहेत.

या वनडे मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबरला धर्मशाळा, दुसरा सामना १३ डिसेंबरला मोहाली तर तिसरा सामना १७ डिसेंबरला वायझॅकला होणार आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार त्यांना धर्मशाळा आणि मोहालीतील थंड वातावरणामुळे वेळेत बदल करावा लागला.

बीसीसीआय त्यांच्या विधानात म्हणाले, ” बीसीसीआयने हिमाचल प्रदेश क्रिकेट बोर्ड आणि पंजाब क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून धर्मशाळा आणि मोहालीत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ वनडे सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे.”

” पहिले दोन्हीही सामने सकाळी ११.३० वाजता सुरु होतील. डिसेंबर महिन्यात उत्तर भारतात वातावरणामुळे तेथील क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. “

त्याचबरोबर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मात्र ठरलेल्या वेळेत दुपारी १.३० वाजता सुरु होईल.

वनडे मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध २० डिसेंबर पासून ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे.