पहिल्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ !

कसोटी मालिकेत श्रीलंकेचा ३-० असा धुव्वा उडवल्यानंतर आता भारतीय संघ श्रीलंकेबरोबर ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरतर श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे.

निवड समिती भारतीय संघाची निवड २०१९चा विश्वचषक लक्षात घेऊन करत आहे. या मालिकेतील खेळाडूंची निवड हा नवीन संघ बांधणीचा प्रयत्न आहे. भारताकडे तसे सलामीपासून ते मधल्या फळीपर्यंत खूप पर्याय आहेत. तरी सुद्धा विश्रांती दिलेल्या खेळाडूंना सोडून जो संघ आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता तोच संघ उद्या खेळण्याची शक्यता आहे.

सलामीवीर (शिखर धवन आणि रोहित शर्मा )

भारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. त्यामुळे त्याची सलामीची जागा तर नक्कीच निश्चित आहे. त्याच बरोबर शिखर धवनने ही वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत २ अर्धशतके लगावली आहेत आणि तो ही फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच बरोबर पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ३ अर्धशतके तर १ शतक लगावले होते.

मधली फळी (विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी )

विराटचा आताच फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. विराटने २००८मध्ये याच श्रीलंकेतील दौऱ्यात त्याने आपले पदार्पण केले होते, आता त्या गोष्टीला ९ वर्ष झाले आहेत. तेव्हा एक युवा खेळाडू म्हणून श्रीलंकेत गेलेल्या विराट कोहली आता भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला आहे. श्रीलंका संघ विराटला थोडा जास्तच आवडतो हे आपल्या सर्वाना माहित आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या क्रमांकावर आहे.

लोकेश राहुल या युवा खेळाडूने आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळे आहे ज्यात त्याने १ शतक आणि १ अर्धशकत लगावले आहे. २०१६मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपल्या पाहिल्या सामन्यातच शतक केले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी देण्यात आली नव्हती. आता कर्णधार विराट कोहली त्याला नवीन पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत सलामीला येणारा राहुल आता चौथ्या क्रमांकावर येईल.

भारताचा दिग्गज फलंदाज आणि मागील एक वर्षांपासून फिनिशरचा रोल सोडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडून भारताला अपेक्षा असतील. मागील काही सामन्यात धोनी जरी फॉर्ममध्ये दिसला नसला तरी धोनी अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सर्वाना माहित आहे.

अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)

विराट कोहली जेव्हा पासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे. केदारची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील शतकी खेळी अजून क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.

फिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल)

सध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

वेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार )

कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारे उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांना या मालिकेत विश्रांती देऊन जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. २०१६च्या विंडीज दौऱ्यात शार्दूल ठाकूरची निवड होऊनही त्याला संधी देण्यात आली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या २६ वर्षीय खेळाडूला आजही भारतीय संघातून संधी देण्यात आली नाही. यावेळी मात्र या गोलंदाजाला राखीव खेळाडूंमध्ये ठेवून चालणार नाही. भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान मिळवून आता बरेच दिवस झाले आहेत. आता त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करताना या दौऱ्यात वरिष्ठ खेळाडूचीही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.