तिसरी कसोटी: सामना अनिर्णित, भारतावर मोठी नामुष्की

दिल्ली। येथील फिरोज शहा कोटला स्टेडियमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी आणि अंतिम कसोटी आज अनिर्णित राहिली. या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी खंबीरपणे खेळपट्टीवर टिकून राहून भारताला यश मिळू दिले नाही. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने शतकी खेळी केली. त्याचबरोबर भारताने ३ कसोटी सामन्यांची ही मालिका १-० ने जिंकली.

श्रीलंकेने काल दिवसाखेर दुसऱ्या डावात भारताच्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३१ धावातच ३ बळी गमावले होते, त्यामुळे आज भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे वाटले असतानाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

आज श्रीलंकेने सकाळच्या सत्रात अँजेलो मॅथ्यूजच्या (१) रूपात चौथा बळी गमावला. त्यालाही रवींद्र जडेजाने टाकलेल्या नो बॉलवर चुकीचे बाद देण्यात आले होते. त्यानंतर मात्र धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दिनेश चंडिमलने डाव सावरत श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. मात्र चंडिमलला(३६) आर अश्विनने त्रिफळाचित बाद केले.

त्यानंतरही डी सिल्वा खेळपट्टीवर टिकून होता. त्याने २१९ चेंडूत ११९ धावांची शतकी खेळी करत भारताला सामन्यात परत येण्यापासून रोखून ठेवले. मात्र त्याला दुखापत झाल्याने पॅव्हिलिअनमध्ये परतावे लागले. त्याने त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १ षटकार मारले.

यानंतर आलेल्या रोशन सिल्वानेही उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करत नाबाद ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला शेवटी निरोशन डिकवेल्लाने (४४*) भक्कम साथ दिली. या दोघांनी शेवटी चांगली लढत दिल्याने अखेर दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: ७ बाद ५३६ धावा (घोषित)
श्रीलंका पहिला डाव: सर्वबाद ३७३ धावा
भारत दुसरा डाव: ५ बाद २४६ धावा (घोषित)
श्रीलंका दुसरा डाव: ५ बाद २९९ धावा

सामनावीर: विराट कोहली.
(पहिला डाव २४३ धावा, दुसरा डाव: ५० धावा)

मालिकावीर: विराट कोहली.