एकदिवसीय मालिकेत या खेळाडूंना मिळणार विश्रांती !

भारताचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. भारत शनिवारी कसोटी मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. म्हणूनच त्यांच्यावर जास्त क्रिकेटचा ताण येऊ नये म्हणून भारतीय संघ व्यवस्थापन या दोघांना एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्याचा विचारत करत आहे.

या महिन्याच्या २० तारखेपासून भारत श्रीलंकेबरोबर ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीची संघ निवड १३ तारखेला होणार असून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते.

आता चालू असलेल्या कसोटी मालिकेत जडेजा आणि अश्विन या दोघांनी मिळून २०० षटके टाकली आहेत. ज्यात जडेजाने १३ तर अश्विनने ११ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांवर जास्त त्राण येतो हे तर जगजाहीर आहे आणि त्यामुळे बऱ्याच दुखापती ही होतात. या कारणास्तव भारतीय संघ व्यवस्थापन जडेजा आणि अश्विनला विश्रांती देणार आहे.

त्याच बरोबर कृणाल पंड्या, युज्वेंद्र चहल आणि अक्षर पटेल या युवा खेळाडूंनाही एकदिवसीय सामन्यात संधी मिळू शकते. तर यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमरा ही संघात परत येऊ शकतो.