भारतीय संघाचा भाग असणे हे खूप दिवसांचे स्वप्न – विजय शंकर

काल बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला त्यांच्या विनंतीनुसार भारतीय कसोटी संघातून विश्रांती देण्यात आली आहे. भुवनेश्वर ऐवजी विजय शंकर या तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. धवन मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल.

याबदल बोलताना विजय म्हणाला “मी यासाठी खूप उत्सुक आहे भारतीय संघाचा हिस्सा असणे हे खूप दिवसांचे स्वप्न होते. जे पूर्ण होणार आहे. माझ्या कष्टांचे फळ मला मिळाले. मला याची अपेक्षा नव्हती परंतु हे खूप छान आहे.भारतीय संघाच्या ड्रेससिंग रूमचा पहिल्यांदाच एक भाग होण्यासाठी मी तयारी करत आहे.”

तो पुढे म्हणाला “भारतीय अ संघाचा मी एक भाग असल्याने मला त्याचा अष्टपैलू खेळाडू बनण्यासाठी खूप फायदा झाला. यामुळे मी वेगवेगळ्या परिस्थितीत कसे खेळायचे हे शिकलो. एक खेळाडू म्हणून मला याने मोठे केले.”

सध्या चालू असलेल्या रणजी स्पर्धेतही त्याने चांगली फलंदाजी केली आहे. याबद्दल तो म्हणाला ” माझ्या फलंदाजीबद्दल मी आनंदी आहे. मी गोलंदाजीही चांगली करत आहे. मुंबई संघाविरुद्ध घेतलेल्या ४ बळींमुळे मला आत्मविश्वास मिळाला.”

दुखापतीमुळे विजयला भारतीय अ संघाच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. त्यामुळे तो सध्या त्याच्या फिटनेसवरपण लक्ष्य ठेवून आहे. तो म्हणाला, ” मला काही सामन्यांना मुकावे लागले त्यामुळे मला त्रास झाला. पण मी माझ्या फिटनेसवर काम केले. एनसीए मध्ये जाऊन तिथे फिजिओ आणि तेथील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. ज्यामुळे मी आणखी सक्षम झालो “

तसेच विजय हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद कडून खेळत होता. एल बालाजी हा हैद्राबाद संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. याबद्दल बोलताना विजय म्हणाला ” बालाजी बरोबर काम केल्याने मला माझ्या गोलंदाजीत सुधारणा करता आली आणि माझा वेगही वाढवता आला.”

विजयचा भाऊ अजय विजयचे कौतुक करताना म्हणाला ” आम्ही त्याला देशाचे प्रतिनिधित्व करताना बघण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचे पदार्पण ही आमच्यासाठी खूप मोठी आणि विशेष आनंदाची गोष्ट असेल. त्याने यासाठी खूप कष्ट घेतले आहेत.”

अजय पुढे म्हणाला “विजयला झालेल्या दुखापतींमुळे त्याला खूप कष्ट घावे लागले. त्यामुळे तो सक्षम झाला आणि त्याला अ संघात खेळण्याची संधी मिळाली.”

२४ नोव्हेंबर  ते २८ नोव्हेंबर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळेल.