व्हिडीओ: वेळकाढू डिकवेल्लाला विराटचे जोरदार प्रतिउत्तर !

कोलकाता। भारत आणि श्रीलंका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीलंकेच्या निरोशन डिकवेल्लाला भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद शमीने प्रतिउत्तर केले आहे. हा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये असे दिसते की शमी गोलंदाजी करताना डिकवेल्ला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता आणि वेळ वाया घालवत होता. याबद्दल त्याच्यात आणि शमीमध्ये थोडा वादही झाला. त्यानंतर मात्र पंच निगेल लॉन्ग यांनी विराट आणि डिकवेल्लाला समोरासमोर बोलावून डिकवेल्लाला समज दिली.

याआधीही डिकवेल्ला आणि त्याचा संघ सहकारी दिनेश चंडिमल या दोघांनी बराच वेळ चर्चा करत वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला होता. हे आर अश्विनने लक्ष्यात आणून दिले होते.

या सामन्यात भारताने ८बाद ३५२ धावांवर दुसरा डाव घोषित केला होता आणि श्रीलंकेला २३१ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु श्रीलंकेचे वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यांच्यावर दबाव वाढला होता. त्याचमुळे सामना अनिर्णित राखण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न होता.

याबद्दल श्रीलंकेचा माजी फलंदाज माहेला जयवर्धनेने ट्विट केले आहे. यात त्याने म्हटले आहे की ” डिकवेल्लाचा ऍटिट्यूड आणि त्यांनी केलेल्या प्रकार बघून मजा आली. विराट खूप छान खेळला.”

यावर विराटनेदेखील जयवर्धनेला उत्तर दिले आहे. तो म्हणाला ” नक्कीच म्हणूनच कसोटी क्रिकेट चांगलं आहे.”

या सामन्यात विराटने आपले कसोटी कारकिर्दीतील १८ वे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वे शतक साजरे केले.