…आणि कुलदीप यादव बनला समालोचक; केले स्वत:च्या गोलंदाजीचे समालोचन

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने शनिवारी तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यानंतर समालोचक होत त्याने त्याच्याच गोलंदाजीचे वर्णन केले आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.

कुलदीप पहिल्या डावात गोलंदाजी करताना संघर्ष करत होता. पण दुसऱ्या डावात त्याने उत्तम गोलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो खूप खूश असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

तसेच त्याने या सामन्यात घेतलेल्या प्रत्येक विकेटचे वर्णन या व्हिडिओमध्ये हिंदी भाषेत केले आहे. त्याचबरोबर शेवटी त्याने समालोचन करण्याचा हा त्याचा पहिलाच प्रयत्न असल्याचेही सांगितले आहे. याबरोबरच कुलदीपने त्याला दिलेल्या शुभेच्छा आणि कौतुकाबद्दल आभारही मानले आहेत.

या सामन्यात दुसऱ्या डावात कुलदीपने शाय होपला 17 धावांवर तर शिमरॉन हेटमेयर आणि सुनील अँब्रिसला 22 व्या षटकात स्वस्तात बाद केले होते. तसेच त्यानंतर त्याने रोस्टन चेस आणि कायरन पॉवेल या स्थिरावलेल्या फलंदाजांचीही विकेट घेतली.

या सामन्यानंतर कुलदीप म्हणाला होता की ‘इंग्लंडमधून परत आल्यानंतर मी माझ्या प्रशिक्षकांकडे गेलो आणि तीन-चार दिवस मी लाल चेंडूने गोलंदाजी केली. कारण मर्यादीत षटकानंतर कसोटीत गोलंदाजी करतना लय पकडायला अवघड होते. ‘

तसेच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलेल्या मार्गदर्शनाचाही फायदा झाल्याचे त्याने सांगितले आहे.

भारत दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 अशा फरकाने पुढे आहे. भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 12 आॅक्टोबरपासून सुरु होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना रंगणार या दोन संघात

महाराष्ट्र डर्बी: पुणेरी पलटन विरुद्ध यू मुम्बामध्ये रंगणार प्रो-कबड्डीचा दुसरा सामना

सलग तीन सामन्यांत रैनाची दमदार कामगिरी, २०१९ विश्वचषकात होऊ शकते जागा पक्की