Video: जडेजाचा मैदानावरच कहर; कर्णधार कोहलीही वैतागला

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सध्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने आज (5 आॅक्टोबर) 9 बाद 649 धावांवर पहिला डाव घोषित केला आहे.

आज भारताकडून कर्णधार विराट कोहली बरोबरच अष्टपैलू रविंद्र जडेजाने शतक साजरे केले. जडेजाने आज या सामन्यात फलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने विंडिजच्या शिमरॉन हेटमेयरला धावबाद केले आहे.

पण त्याची ही धावबाद करण्याची संधी जवळ जवळ हुकली असती परंतू त्याने शेवटच्या क्षणी वेळेचे भान ठेवत हेटमेयरला बाद केले.

झाले असे की आर अश्विन डावातील 12 व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी या षटकातील चौथ्या चेंडूवर हेटमेयरने सरळ मिड-आॅनच्या दिशेने फटका मारला. पण तो चेंडू सरळ जडेजाच्या हातात गेला.

याचवेळी हेटमेय़र आणि नॉन स्ट्रायकर एन्डला असणाऱ्य़ा सुनील अम्ब्रिसमध्ये धाव घेण्यासाठी गोंधळ झाला आणि ते दोघेही एकाच एन्डच्या दिशेने धावले.

त्यामुळे दोन्ही फलंदाजांना एकाच एन्डला पाहुन जडेजाने चेंडू गोलंदाज अश्विनकडे फेकण्याऐवजी स्वत:च स्टंपच्या दिशेने चालू लागला. यामुळे हेटमेयरला दुसऱ्या एन्डला धावण्याची संधी मिळाली.

हेटमेयरने धावण्यासाठी वेग पकडला. त्यावेळी जडेजाला भान आले आणि त्याने चेंडू थेट स्टंपवर फेकला. या चेंडूने हेटमेयर क्रिजच्या आत पोहचण्याआधीच स्टंपवरचे बेल्स उडल्या, त्यामुळे तो धावबाद झाला.

मात्र यानंतर जडेजाला अश्विन आणि विराटने अशा कृतीबद्दल प्रश्न विचारला. ज्यावर जडेजा फक्त हसला आणि त्यानंतर विराटनेही हसून विकेट मिळाल्याचा आनंद घेतला.

या सामन्यात विंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली. त्यांनी 50 धावांच्या आतच 5 विकेट्स गमावल्या होत्या. विंडिजने दुसऱ्या दिवसाखेर 29 षटकात 6 बाद 94 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-