सातत्याने अपयशी ठरणाऱ्या केएल राहुलवर चाहत्यांची सोशल मिडियातून टीका

हैद्राबाद। राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध विंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने विंडिजला दुसऱ्या दिवसाच्या(13 आॅक्टोबर) पहिल्या सत्रातच पहिल्या डावात 311 धावांवर रोखले आहे.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी आला. भारताकडून सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने चांगली सुरुवात केली पण केएल राहुल मात्र फलंदाजी करताना संघर्ष करत होता.

या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली आहे. परंतू यात राहुलने फक्त 4 धावांचे योगदान दिले आहे. राहुलला 9 व्या षटकात विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने त्रिफळाचीत केले. राहुलने या 4 धावा 25 चेंडूत केल्या आहेत.

राहुलला विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीतही धावा करण्यात अपयश आले होते. तो पहिल्या कसोटीत शून्य धावेवर बाद झाला होता. तसेच राहुल इंग्लंड दौऱ्यातही धावा करण्यासाठी संघर्ष करत होता. त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 10 डावात 299 धावा केल्या होत्या.

तसेच सातत्याने संधी मिळूनही राहुल धावा करण्यात अपयशी ठरत असल्याने चाहते निराश झाले आहे. त्यांनी त्यांची निराशा सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या मयांक अगरवालला मात्र या कसोटी सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. तसेच मुरली विजयलाही विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या गोष्टींनाही चाहत्यांनी अधोरेखीत करत राहुलवर टीका केली आहे.

भारताने या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 4 बाद 173 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात सर्वाधिक धावा पृथ्वी शॉने केल्या आहेत. त्याने 70 धावांची अर्धशतकी खेळी केली.

तसेच तत्पूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांत 6 विकेट घेत विंडिजला पहिल्या डावात 311 धावांवर रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे

अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय

विराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम