- Advertisement -

रोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर २६ धावांनी विजय

0 43

चेन्नई । येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २६ धावांनी विजय मिळवला. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.

भारताच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाही. ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली. त्यात ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर (२५), मॅक्सवेल (३९) आणि फॉकनर (३०) यांनी दोन आकडी धावसंख्या केली. भारताकडून युझवेन्द्र चहल (३), कुलदीप यादव(२), हार्दिक पंड्या(२), जसप्रीत बुमराह(१) आणि भुवनेश्वर कुमार (१) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २८१ धावा केल्या आहेत. पांड्याने दणदणीत अर्धशतक करत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ६६ चेंडूत ८३ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने ८८ चेंडूत ७९ धावा केल्या. धोनीने आपली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वी अर्धशतकी खेळी केली.

सलामीवीर फलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर भारताचा डाव हार्दिक पंड्या आणि धोनीने सांभाळला. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. पंड्या बाद झाल्यानंतर धोनीने भुवनेश्वर कुमारला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली.

भारताला पहिला झटका संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या रूपाने लागला. त्यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहलीही बाद झाला. विराटला तर भोपळाही फोडता आला नाही. मनीष पांडे ही शून्य धावा करून तंबूत परतला. केदार जाधव आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होते. पण स्टोयनिक्सच्या गोलंदाजीवर शर्मा बाद झाला. त्यानंतर केदार जाधव व माजी कर्णधार धोनीने संघाला सांभाळले व संघाची धावसंख्या २८०च्या पुढे नेली.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कॉल्टर-नाइल आणि स्टोयनिक्सने सुरेख गोलंदाजी केली. नॅथन कॉल्टर-नाइलने ३ विकेट्स घेतल्या तर स्टोयनिक्स २ विकेट्स घेतल्या.

Comments
Loading...
%d bloggers like this: