भारताने टी२० मालिका २-१ अशी जिंकली !

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. भारताने ८ षटकांत ६८ धावांचे लक्ष दिले असताना न्यूझीलँड संघाला केवळ ६१ धावा करता आल्या.

भारतीय संघाप्रमाणेच न्यूझीलँड संघाचीही सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टिल १ तर कॉलिन मुनरो ७ धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यमसनलाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला हार्दिक पंड्याने ११ धावांवर धावबाद केले.

ग्लेन फिलिप्सला कुलदीप यादवने ११ धावांवर शिखर धवनकडे झेल द्यायला भाग पाडले. त्यामुळे ४.४ षटकांत न्यूझीलँडची अवस्था ४ बाद २८ अशी झाली.

१८ चेंडूत ३२ धावांची गरज असताना मैदानात कॉलिन डी ग्रँडहोम आणि हेन्री निकोलस हे फलंदाज होते. परंतु हेन्री निकोलसला बुमराह स्वस्तात २ धावांवर श्रेयस अय्यरकडे झेल द्यायला लावत भारताला सामन्यात परत आणले.

संघासाठी ६वे शतक टाकणाऱ्या युझवेन्द्र चहलने केवळ ३ धावा देत संघासाठी उपयुक्त षटक टाकले.

११ चेंडूत २९ धावांची गरज असताना मैदानावर कॉलिन डी ग्रँडहोम आणि टॉम ब्रूस हे खेळाडू होते. पहिल्याच चेंडूवर ब्रूसने बुमराहला चौकार खेचत इरादे स्पष्ट केले. परंतु धोनी पंड्याने त्याला ५व्या चेंडूवर धावबाद केले. त्याने २ चेंडूत ४ धावा केल्या.

शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना कर्णधार विराट कोहलीने चेंडू हार्दिक पंड्याकडे सोपवला. हार्दिक पंड्याने पहिल्या २ चेंडूवर केवळ १ धाव दिली. परंतु तिसऱ्या चेंडूवर कॉलिन डी ग्रँडहोमने पांड्याला षटकार खेचला. चौथा चेंडू पंड्याने वाइड टाकला. त्यामुळे समीकरण ३ बॉल ११ असे झाले.

पुढच्याच चेंडूवर त्याने १ धाव दिली. त्यामुळे न्यूझीलँडला जिंकण्यासाठी शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज होती. पंड्याने पुढच्या चेंडूवर २ धावा दिल्या. त्यामुळे १ चेंडूत ८ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर १ धाव देत भारताने सामना ६ धावांनी जिंकला.

भारताकडून भुवनेश्वर कुमार(२), जसप्रीत बुमराह (२), कुलदीप यादव(१) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी न्यूझीलँड संघाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले होते. भारताने निर्धारित ८ षटकांत 5 बाद 67 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे हा सामना ८ षटकांचा करण्यात आला होता.

भारतीय सलामीवीरांना या सामन्यात विशेष चमक दाखवता आली नाही. शिखर धवन ६ चेंडूत ६ तर रोहित शर्मा ९ चेंडूत ६ धावा काढून बाद झाले. १५ वर २ अशी अवस्था असताना कर्णधार विराट कोहलीने ६ चेंडूत १३ धावा केल्या. परंतु त्यालाही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

आपला तिसराच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरला संधीचे सोने करता आले नाही. तोही ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. मनीष पांडे ११ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. त्याने १ चौकार आणि १ षटकार खेचला.

हार्दिक पंड्या (14)आणि एमएस धोनी (0) यांनी जास्त पडझड होऊ न देता संघाला ८ षटकांत 67 धावांचा टप्पा पार करून दिला.