तिसरी कसोटी भारताने जिंकली

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ६३ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील व्हाईटवॉश टाळला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. तसेच या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-१ असा विजय मिळवला.

आज दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात १ बाद १७ धावांपासून खेळायला सुरुवात केली. काल खेळपट्टी धोकादायक आहे कि नाही याबद्दल प्रश्न उभा राहिला होता त्यामुळे आज सामना पुढे खेळवला जाणार का असा प्रश्न होता परंतु आज सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर फलंदाज डीन एल्गारने एकमेव लढत दिली. बाकी फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही. एल्गारने आज २४० चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ हाशिम अमलानेही अर्धशतक केले, परंतु त्याला त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयश आले. अमलाने १४० चेंडूं ५२ धावा केल्या.

बाकी फलंदाजांनी काही खास केले नाही. एबी डिव्हिलियर्स(६), फाफ डू प्लेसिस(२), एडिन मार्करम(४), व्हर्नोन फिलँडर(१०) आणि लुंगी एन्गिडीने( ४) धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेचे ४ फलंदाज शून्य धावेवर बाद झाले.

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारतीय गोलंदाजांनी या आव्हानाचे उत्तम रक्षण केले. भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (२८/५),भुवनेश्वर कुमार (३९/१),जसप्रीत बुमराह (५७/२) आणि इशांत शर्मा (३१/२) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७७ धावातच संपुष्ठात आणला.

या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा (५०) आणि विराट कोहलीने (५४) अर्धशतके केली होती तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने ४८ धवनची खेळी केली होती. तसेच या सामन्यात शमीने एकूण ६ आणि जसप्रीत बुमराहने एकूण ७ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: सर्वबाद १८७ धावा
दक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद १९४ धावा
भारत दुसरा डाव: सर्वबाद २४७ धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव: सर्वबाद १७७ धावा

सामनावीर:भुवनेश्वर कुमार

मालिकावीर:व्हर्नोन फिलँडर