भारताच्या रणरागिणी आज दक्षिण आफ्रिकेत घडवणार इतिहास ?

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना उद्या किमबर्ली येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

काल किमबर्ली येथेच पहिला वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवला होता. या सामन्यात सलामी फलंदाज स्म्रिती मानधनाने ८४ धावांची अर्धशतकी केली होती तसेच तिची आणि कर्णधार मिताली राजमध्ये ९९ धावांची भागीदारी रंगली होती.

याबरोबरच भारताने दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने १२५ धावांवर सर्वबाद केले होते. यात भारताकडून झुलन गोस्वामीने ४ तर शिखा पांडेने ३ विकेट घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेकडून फक्त कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने ४१ धावांची खेळी केली. हीच दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. तर त्यांच्याकडून मॅरिझिना कॅप आणि आयबॉन्ग खाया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या होत्या.

आता भारतासमोर हाच फॉर्म कायम ठेवण्याचे आव्हान असेल. भारताला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याची संधी आहे. भारतीय संघ विश्वचषकानंतर जवळ जवळ ६ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय मालिका खेळात आहे. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरु असलेली ही द्विपक्षीय वनडे मालिका आयसीसी चॅम्पिअन्सशिपचा एक भाग आहे.