राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांनी आज दक्षिण आफ्रिका हॉकी संघावर १-० ने मात केली.

राणी रामपाल कर्णधार असलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली लढत दिली होती. सामन्याच्या तीनही सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. अखेर चौथ्या सत्रात भारताची कर्णधार राणीने ४८ व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली.

ही आघाडी भारतीय महिलांनी कायम ठेवताना दक्षिण आफ्रिकेला एकही गोल करू दिला नाही. या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

याआधी भारतीय महिलांना या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच वेल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर मात्र भारतीय महिला संघाने पुनरागमन करताना मलेशिया आणि इंग्लंड यांना पराभूत केले.

भारतीय महिला हॉकी संघाप्रमाणेच पुरुष संघानेही मलेशियाला २-१ने पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे.