मिताली राजचा संघ दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देऊन घडवणार का इतिहास?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय महिला संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

यामुळेच उद्या भारतीय महिला संघाला वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. उद्या पोचेफस्टरूम येथे दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल. 

याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असे सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात ८८ धावांनी तर दुसऱ्या सामन्यात १७८ धावांनी विजय मिळवला होता. 

भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाचा या दोन्ही वनडेत चांगला खेळ झाला आहे. तिने पहिल्या वनडेत अर्धशतक तर दुसऱ्या वनडेत शतकी खेळी केली आहे. 

तसेच दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची महान गोलंदाज झुलन गोस्वामीने वनडे कारकिर्दीतील २०० विकेट घेण्याचा टप्पा पार केला. हा टप्पा गाठणारी ती पहिलीच महिला गोलंदाज ठरली आहे. तसेच भारताची पूनम यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा या गोलंदाजांनीही या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. 

भारताची आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थी या दोघीनींही दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतके झळकावून आपणही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. आता तिसऱ्या सामन्यातही भारताची अशी शानदार कामगिरी होते का हे पाहावे लागेल. 

दक्षिण आफ्रिका संघाकडून अजून तरी विशेष अशी कामगिरी झालेली नाही. फक्त दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिझेल लीने ७५ चेंडूत ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. दोन सामन्यात मिळून दक्षिण आफ्रिकेकडून हे एकमेव अर्धशतक झाले आहे.  

असे असले तरी दक्षिण आफ्रिकाही उद्याच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या आणि प्रतिष्ठा जपण्याच्याच इराद्याने मैदानात उतरेल. 

यातून निवडला जाईल भारतीय संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिस्त, स्म्रिती मानधना, पूनम राऊत, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, जेमिमाह रॉड्रीगुएस, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णामूर्थी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक)