भारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान

भारतीय महिलांनी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्थीने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे.

आज भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खराब झाली. मागील दोन सामन्यात अर्धशतक आणि शतक करणारी सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधना आज शून्य धावेवरच बाद झाली. तिला शबनीम इस्माइलने लॉरा वोलवार्डकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर काही वेळातच कर्णधार मिताली राजही(४) बाद झाली. तिला क्लो ट्रायऑनने बाद केले. त्यानंतर मात्र सलामीला आलेल्या दीप्तीने आणि हरमनप्रीत कौरने(२५) डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीतला दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने बाद केले. दीप्ती आणि हरमनप्रीतने मिळून तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली.

हरमनप्रीत बाद झाली तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ५७ धावा अशी झाली होती. यानंतर मात्र दीप्तीने आणि वेदाने डाव सांभाळत ८३ धावांची भक्कम भागीदारी केली. दिप्तीने ८ चौकारांच्या साहाय्याने ११२ चेंडूत ७९ धावा केल्या. तसेच वेदाने ६४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली.

बाकी फलंदाजांमध्ये मोना मेश्राम(११),सुषमा वर्मा(१७),पूजा वस्त्रकार(१), शिखा पांडे(३१*), एकता बिश्त(१) आणि पूनम यादव(२) यांनी धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माइल(४/३०), क्लो ट्रायऑन(२/४८),रायसिब टोझखे(१/३९),डेन व्हॅन निएकर्क(१/२८) आणि आयबॉन्ग खाका(१/४७) यांनी विकेट्स घेऊन भारताला ५० षटकात सर्वबाद २४० धावांवर रोखले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर पूनम यादव धावबाद झाली.