भारतीय महिला संघाचा ७ विकेट्सने पहिल्या टी २० सामन्यात विजय

भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताकडून मिताली राजने नाबाद अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे.

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र आज स्फोटक खेळणारी सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधना १५ चेंडूत २८ धावा करून बाद झाली.

तिच्या पाठोपाठ लगेचच टी २० कर्णधार हरमनप्रीत कौर शून्य धावेवर धावबाद झाली. त्यानंतर मात्र मुंबईच्या जेमिमा रोड्रिगेजने मितालीची चांगली साथ देत ६९ धावांची भागीदारी करून भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणून दिला. जेमिमा २७ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली.

त्यानंतर मिताली आणि वेदा कृष्णमूर्थीने आणखी पडझड होऊ दिली नाही. मितालीने आज ४८ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. या खेळीत तिने ६ चौकार आणि १ षटकार मारला. मितालीचे हे आंतराष्ट्रीय टी २०मधील ११ वे अर्धशतक आहे. तसेच वेदाने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने २२ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून मोसॅलिन डॅनिएल्स(१/१६) आणि कर्णधार डेन व्हॅन निएकर्क(१/२३) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६४ धावा केल्या होत्या. अष्टपैलू क्लो ट्रायऑनने अखेरच्या दोन षटकात स्फोटक फलंदाजी करत ७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. तिने या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार निएकर्कने देखील चांगली खेळी केली. तिने ३१ चेंडूत ३८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या आजच्या डावातील हीच सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या होती.

दक्षिण आफ्रिकेकडून अन्य फलंदाजांपैकी लिझेल ली(१९), सून लुस(१८),मिग्नॉन द्यू प्रीझ(३१) आणि नादिन डे क्लर्कने(२३) धावा केल्या. तर भारताकडून अनुजा पाटील(२/२३), पूजा वस्त्रकार(१/३४) आणि शिखा पांडे (१/४१) यांनी विकेट्स घेतल्या.