विजयासह भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी

किमबर्ली। भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा सामना १७८ धावांनी जिंकला आहे. या विजयाबरोबरच त्यांनी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. आज या सामन्यात झुलन गोस्वामीने महिला वनडे क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेण्याचा इतिहास रचला आहे. तसेच स्म्रिती मानधनाने शतकी खेळी केली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांची सलामीवीर फलंदाज लॉरा वोलवार्डला ९ धावांवर बाद करत झुलनने भारताला पहिले यश मिळवून दिले आणि वनडे कारकिर्दीतील २०० वी विकेट घेतली. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव त्यांच्या फलंदाजांना सांभाळतच आला नाही त्यांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट्स गमावल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून फक्त लिझेल लीने एकाकी लढत दिली. तिने ७५ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यात तिने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मात्र तिला बाकी एकही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. बाकी फलंदाजांपैकी मॅरिझिना कॅप(१७) व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही.

भारताकडून झुलन गोस्वामी(१/२९), पूनम यादव(४/२४), राजेश्वरी गायकवाड(२/१४) आणि दीप्ती शर्मा(२/३४) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव ३०.५ षटकात १२४ धावांवर संपुष्टात आणला.

तत्पूर्वी भारताने ५० षटकात ३ बाद ३०२ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताकडून स्म्रितीने १२९ चेंडूत १३५ धावांची आक्रमक खेळी केली होती. तिने या खेळीत १४ चौकार आणि १ षटकार खेचला आहे. त्याबरोबरच हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्थीने शेवटच्या काही शतकात आक्रमक फटके मारताना नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. हरमनप्रीतने ६९ चेंडूत नाबाद ५५ धावा तर वेदाने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावांची तडाखेबंद खेळी केली.

मात्र आज सलामीवीर फलंदाज पूनम राऊतला आणि कर्णधार मिताली राजला खास काही करता आले नाही. या दोघींनीही प्रत्येकी २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना फलंदाजीला येण्याची गरज पडली नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून मस्बाता क्लास(१/६५),सून लूस(१/३१) आणि रायसिब टोझखे(१/६३) यांनी बळी घेतले.