होती मानधना म्हणून वाचला सामना!

आज भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघांमध्ये नागपूर येथे पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिलांनी १ विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाने अर्धशतक करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी २०८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना भारताने चांगली सुरुवात केली. पण चांगल्या सुरुवातीनंतर सलामीवीर फलंदाज देविका विद्या १५ धावांवर बाद झाली. त्यानंतर लगेचच कर्णधार मिताली राज बाद झाली. तिला आज शून्य धावेवरच डॅनिएल हेझलने बाद केले.

यानंतर मात्र हरमनप्रीत कौरने मानधनाची चांगली साथ दिली. पण ती सुद्धा २१ धावा करून बाद झाली. तर त्यानंतर काही वेळातच दीप्ती शर्माही(२४) खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर बाद झाली. त्यापाठोपाठ अर्धशतक करून एकाकी लढत देणाऱ्या मानधनाला जॉर्जिया एल्विसने बाद केले. मानधनाने आज १०९ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारत ८६ धावा केल्या.

मात्र बाकी फलंदाजांना खास काही करता आले नसले तरी मानधनाने केलेल्या अर्धशतकामुळे भारताला विजयाचा पाय रचणे सोपे गेले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर भारताने १ विकेटने विजय मिळवला.

भारताकडून अन्य फलंदाजांपैकी वेदा कृष्णमूर्थी(८), सुषमा वर्मा(३), झुलन गोस्वामी(२), एकता गोस्वामी(१२*), शिखा पांडे(४) आणि पूनम यादव(७*) यांनी धावा केल्या. तर इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन(४/३७), जॉर्जिया एल्विस(२/१४) आणि डॅनिएल हेझल(२/३४) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना फ्रँन विल्सन(४५), टॅमी बोमोंट(३७) आणि डॅनिएल हेझलने(३३) धावा करत थोडीफार लढत दिली. पण बाकी फलंदाजांकडून मात्र निराशा झाली. त्यांच्या एकही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही.

इंग्लंडकडून बाकी फलंदाजांपैकी डॅनिएल वॅट(२७), एमी एलेन जोन्स(०), नताली सायव्हर(२१), जॉर्जिया एल्विस(१), एलिस डेव्हिडसन रिचर्ड्स(९), अन्या श्रबसोल(४), सोफी एक्लेस्टोन(१) आणि अॅलेक्स हार्टली(३*) यांनी धावा केल्या.

भारताकडून पूनम यादव(४/३०), एकता बिश्त(३/४९), दीप्ती शर्मा(२/२५) आणि झुलन गोस्वामी(१/३२) यांनी विकेट्स घेत इंग्लंडला ४९.३ षटकात २०७ धावांवर सर्वबाद केले.