भारताच्या महिलांचाही दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय 

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात आज पहिला वनडे सामना पार पडला या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवला. भारतीय संघाकडून झुलन गोस्वामी आणि शीखा पांडे यांनी मिळून ७ बळी घेतले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना स्म्रिती मानधनाने अर्धशतकी खेळी केली होती. 

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात २१४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण शीखा पांडेने दक्षिण आफ्रिकेला सुरवातीला चांगलेच धक्के दिले तिने दक्षिण आफ्रिकेचे पहिले तीनही फलंदाज २३ धावतच माघारी पाठवले. त्यामुळे त्यांची फलंदाजी चांगलीच ढेपाळली. 

शिखाच्या गोलंदाजीतील या आक्रमानंतर झुलन गोस्वामीने दक्षिण आफ्रिकेच्या तळातील फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डेन व्हॅन निएकर्कने ४१ धावांची खेळी केली. हीच दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

तिच्याबरोबरच लॉरा वोलवार्ड(२१) आणि मॅरिझिना कॅप(२३) यांनी थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही भारतीय गोलंदाजांनी जास्तवेळ टिकू दिले नाही. तर सुन लूस(२१*) ही शेवटपर्यंत नाबाद राहिली, पण तिला फलंदाजांनी विशेष साथ दिली नाही. 

भारताकडून शिखा पांडे(३/२३), झुलन गोस्वामी(४/२४), पूनम यादव(२/२२) आणि राजेश्वरी गायकवाड(१/२०) यांनी बळी घेऊन दक्षिण आफ्रिकेला ४३.२ षटकातच १२५ धावात सर्वबाद केले. 

तत्पूर्वी भारताने ५० शतकात ७ बाद २१३ धावा केल्या होत्या. भारताकडून स्म्रिती मानधनाने ९८ चेंडूत ८४ धावा केल्या. तिने तिच्या या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार मारला. तिला भक्कम साथ दिली ती कर्णधार मिताली राजने. या दोघींनी मिळून ९९ धावांची भागीदारी रचली. मितालीने ७० चेंडूत ४५ धावांची खेळी केली. 

या दोघींव्यतिरिक्त भारताकडून बाकी फलंदाजांना काही खास करता आले नाही. हरमनप्रीत कौर(१६) कडून सर्वांना अपेक्षा होती पण तीही लवकर बाद झाली. 

दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझिना कॅप(२/२६) ,आयबॉन्ग खाका(२/४७) आणि मसाबत क्लास(१/३६) यांनी बळी घेतले. तर भारताच्या वेदा कृष्णमूर्थी(२) आणि दीप्ती शर्मा(६) धावबाद झाल्या.   

भारतीय संघाने विश्वचषकानंतर जवळ जवळ ६ महिन्यांनंतर आंतराष्ट्रीय सामना खेळला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असलेली ही ३ सामन्यांची वनडे मालिका आयसीसी चॅम्पिअन्सशिपचा एक भाग आहे.