भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवून टी २० मालिकेवर कब्जा!

केपटाउन। भारताने आज तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. भारताकडून प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका चोख पार पाडत दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ६ बाद १६५ धावांवर रोखले.

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रिझा हेन्ड्रिक्सने १० धावांवर असताना आपली विकेट गमावली. त्याच्या पाठोपाठ काही वेळानंतर आज सलामीला आलेल्या डेव्हिड मिलरला(२४) सुरेश रैनाने बाद करत दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका दिला.

यानंतर लगेचच हेन्रिक क्लासेनही(७) बाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था १२.५ षटकात ३ बाद ७९ धावा अशी झाली. त्यानंतर मात्र क्रर्णधार जेपी ड्युमिनी आणि ख्रिस्तियन जोंकर यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी खेळपट्टीवर स्थिर झाल्यासारखी वाटत असतानाच ड्युमिनी ४१ चेंडूत ५५ धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ख्रिस मॉरीसही(४) बाद झाला.

अखेरपर्यंत जोंकरने एकाकी लढत दिली पण तोही अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याने २४ चेंडूत ४९ धावा करताना ५ चौकार आणि २ षटकार मारला. अखेर फरहान बेहार्डीन(१५*) नाबाद राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार(२/),जसप्रीत बुमराह(१/३९), शार्दूल ठाकूर(१/३५), सुरेश रैना(१/२७) आणि हार्दिक पंड्या(१/२२) यांनी विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी भारताकडून शिखर धवन आणि सुरेश रैनाने चांगली लढत दिली. आजही रोहित शर्मा(११) लवकर बाद झाला. त्यानंतर धवन आणि रैनाने डाव सांभाळत ६५ धावांची भागीदारी रचली.

धवनने ४० चेंडूत ४७ धावा केल्या. यात त्याने ३ चौकार मारले. तर रैनाने २७ चेंडूत ४३ धावा करताना ५ चौकार आणि १ षटकार मारला. बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही.

बाकी फलंदाजांपैकी मनीष पांडेने(१३), हार्दिक पंड्या(२१),एमएस धोनीने(१२), दिनेश कार्तिक(१३),भुवनेश्वर कुमार(३*) आणि अक्षर पटेल(१*) यांनी धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डाला(३/३५), ताब्राईझ शम्सी(१/३१) आणि ख्रिस मॉरिस(२/४३) यांनी विकेट्स घेत भारताला २० षटकात ७ बाद १७२ धावांवर रोखले.

या सामन्यात सामनावीर पुरस्कार सुरेश रैनाला तर मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार भुवनेश्वर कुमारला देण्यात आला.