दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून भारतीय संघाने रचला इतिहास

भारताने आज दक्षिण आफ्रिकेवर ७३ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम विराटच्या भारतीय संघाने केला आहे. ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने ४-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन विजयात महत्वाची कामगिरी बजावली. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकात विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली. हाशिम अमला आणि प्रभारी कर्णधार एडिन मार्करमने ५२ धावांची सलामी भागीदारी केली. पण मार्करमने ३२ धावांवर आपली विकेट गमावली.

त्यानंतर अमलाने एका बाजून चांगला खेळ चालू ठेवला होता मात्र त्याला बाकी फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सही(६) आज लवकर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर(३६) आणि हेन्रिक क्लासेन(३९) यांनी थोडी फार लढत दिली. पण खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर यांनीही आपल्या विकेट गमावल्या.

अमलाने आज एकाकी लढत देताना ९२ चेंडूत ७१ धावा केल्या. त्याने त्याच्या अर्धशतकी खेळीत फक्त ५ चौकार मारले. तो बाद झाल्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बाकी फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. 

मागच्या सामन्यात स्फोटक फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देणारा अँडिल फेहलूकवयो आज शून्य धावेवर बाद झाला, त्याच बरोबर ताब्राईझ शम्सीही शून्य धावांवर बाद झाला. बाकी फलंदाजांपैकी जेपी ड्युमिनी(१), कागिसो रबाडा(३), मोर्ने मॉर्केल(१) आणि लुंगीसानी एन्गिडी(४*) यांनी धावा केल्या.

भारताकडून कुलदीप यादव(४/५७), हार्दिक पंड्या(२/३०), युझवेन्द्र चहल(२/४३) आणि जसप्रीत बुमराह(१/२२) यांनी विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव ४२.२ षटकात २०१ धावांवर संपुष्टात आणला.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली होती. मागील काही सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा या सामन्यात फॉर्ममध्ये आला. त्याने आज ११ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १२६ चेंडूत ११५ धावा केल्या. तो ९७ धावांवर असताना त्याला शम्सीकडून झेल सुटल्यामुळे जीवदान मिळाले होते. रोहितचे हे वनडे कारकिर्दीतील १७ वे शतक आहे.

शिखर धवन ३४ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि रोहित यांच्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. मात्र आज विराट धावबाद झाला. त्याने ५४ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याच्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेनेही आपली विकेट गमावली.

विराट आणि रहाणेची विकेट पडल्यामुळे रोहित आणि श्रेयश अय्यरने फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. या दोघांनी मिळून ६० धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. अय्यरने रोहितची भक्कम साथ देताना ३० धावांची छोटेखानी खेळी केली.

रोहित आणि अय्यर बाद झाल्यावर अन्य फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. अन्य फलंदाजांपैकी एम एस धोनी(१३), हार्दिक पंड्या(०),भुवनेश्वर कुमार(१९*) आणि कुलदीप यादव(२*) यांनी धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगीसानी एन्गिडी(४/५१) आणि कागिसो रबाडा(१/५८) यांनी विकेट्स घेऊन भारताला ५० षटकात ७ बाद २७४ धावांवर रोखले.