अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा ६ धावांनी न्यूझीलंडवर विजय 

भारताने मालिका २-१ अशी जिंकली

0 377

कानपुर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या अटीतटीच्या, तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने ६ धावांनी विजय मिळवून मालिकाही जिंकली. भारतीय संघाने २-१ अश्या फरकाने ही मालिका खिशात घातली.

भारतीय संघाने न्यूझीलंडला ३३८ धावांचे लक्ष दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली झुंज दिली. न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली होती. परंतु सलामीवीर मार्टिन गप्टिल १० धावा करून बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने बाद करून वनडेत आपले ५० बळी पूर्ण केले.

गप्टिल बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलिअमसन आणि सलामीवीर कोलिन मुनरो यांनी उत्कृष्ट फलंदाजी करताना संघाचा डाव सांभाळला. या दोघांनीही आपापले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्यांनी १०९ धावांची शतकी भागीदारी रचली.

न्यूझीलंड सामन्यात हळू हळू पुढे सरकत असतानाच मुनरो ६२ चेंडूत ७५ धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच कर्णधार विलिअमसन ८४ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला.

या दोघांनंतर पहिल्या वनडे सामन्यात चमकलेली न्यूझीलंडची रॉस टेलर आणि टॉम लेथम ही जोडी मैदानावर होती. या जोडीने संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. ही भागीदारी बुमराहने टेलरला (३९ धावा) बाद करून तोडली.

टॉम लेथम चांगल्या लयीत खेळत होता त्यामुळे त्याने संघाला विजयाच्या जवळ पोहचवले होते. त्याने हेन्री निकोलासला साथीला घेत खेळ पुढे चालू ठेवला होता. अखेर भुवनेश्वर कुमारने निकोलासला (३७ धावा) बाद करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला.

अखेरचे काही षटके बाकी असताना लेथम ६५ धावा करून धावबाद झाला. त्याला बुमराहने एम एस धोनीने पास केलेल्या चेंडूवर उत्तमरीतीने धावबाद केले. त्यामुळे अखेरच्या काही षटकात कोलिन द ग्रँडहोम आणि मिचेल सॅन्टेनर ही नवीन जोडी मैदानावर आली.

सामन्याच्या अखेरच्या षटकात न्यूझीलंडला १५ धावांची गरज होती. या षटकात बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करताना सॅन्टेनरला (९ धावा) शिखर धवन कारवी झेलबाद केले आणि भारताला विजय मिळवून दिला. अखेर ग्रँडहोम (८ धावा) आणि टीम साऊथी (४ धावा) करून नाबाद राहिले.

भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने ३ बळी तर युजवेंद्र चहलने २ बळी घेतले. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारने १ बळी घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना उत्तम कामगिरी केली होती. भारताच्या रोहित शर्मा (१३८ चेंडूत १४७ धावा) आणि कर्णधार विराट कोहलीने (१०६ चेंडूत ११३ धावा) शतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने ६बाद ३३७ धावा केल्या.

रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ थे मॅच देण्यात आले. तसेच मालिकावीराचा किताब  कर्णधार विराट कोहलीने जिंकला. भारताने ही मालिका जिंकतानाच सलग सातवी मालिका जिंकली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: