पहिल्या वनडेसाठी भारत, श्रीलंका संघाचे धरमशालेत आगमन !

धरमशाला। येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघाचे आगमन झाले आहे. या दोन संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबरला धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी राज्य क्रिकेट संघटनेकडून ५ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत क्रीडा आणि स्वच्छता जनजागरूकतेचा कार्यक्रम घेतला जाणार होता. या कार्यक्रमात विजयी होणाऱ्या स्पर्धकांना सामन्याची तिकिटे देण्यात येणार आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या या वनडे मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. त्याला या मालिकेसाठी आणि २० डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघाने याआधी श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला होता. या विजयाबरोबरच भारतीय संघाने सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.