२०११ विश्वचषकाचा हिरो गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती

भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजयाचा हिरो गौतम गंभीरने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने व्हिडिओच्या आधारे ही माहिती सर्वांना दिली आहे.

गंभीरने आत्तापर्यंत भारताकडून 58 कसोटी सामने, 147 वनडे सामने आणि 37टी20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 242 सामने खेळताना 38. 45 च्या सरासरीने 10324 धावा केल्या आहेत. यात त्याने 20 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत.

गौतम गंभीरने या व्हिडिओमध्ये त्याच्या कारकिर्दीत त्याला मदत केलेल्या सर्वांचे, कुटुंबाचे आणि प्रशिक्षक संजय भारद्वाज यांचे आभार मानले आहेत.

तसेच त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘हा खूप कठिण निर्णय होता. मी तो निर्णय जड अंतकरणाने घेत आहे.’

तसेच त्याने या व्हिडिओमध्ये असेही म्हटले आहे की 2007 चा टी20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक जिंकणे हे आनंददायी क्षण होते. तसेच 2009 ला कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आलेल्या भारतीय संघाचाही भाग असल्याचा आनंद आहे असेही त्याने म्हटले आहे.

37 वर्षीय गंभीरने 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका विरुद्ध 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच एमएस धोनीबरोबर 109 धावांची भागीदारीही रचली होती. गंभीरला आयसीसीने 2009 ला सर्वोत्तम क्रिकेटपटूचाही पुरस्काराने गौरविले होते.

गंभीरने 11 एप्रिलला बांगलादेश विरुद्ध ढाका येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे 9 ते 13 नोव्हेंबर 2016 दरम्यान झालेला कसोटी सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

तसेच त्याने नुकतेच दिल्लीकडून रणजी ट्रॉफीचे सामने खेळले आहेत. पंजाब विरुद्ध 28 नोव्हेंबरला खेळलेला रणजी सामना त्याचा शेवटचा सामना होता. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात 60 धावांची खेळी केली होती.

याबरोबरच तो आयपीएलमध्येही खेळणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनी आणि धवनने ही गोष्ट करायलाच हवी, गावसकरांनी ठणकावले

आॅस्ट्रेलियन भूमीत या संघाने आॅस्ट्रेलिया विरुद्ध मिळवले आहेत सर्वाधिक कसोटी विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीला हा खास विक्रम करण्याची संधी