न्यूजीलँडकडून भारत दौऱ्याची पराभवाने सुरुवात

मुंबई। आज ब्रेबॉर्न स्टेडिअमवर अध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँड संघात सराव सामना सुरु होता. या सामन्यात अध्यक्षीय संघाने न्यूजीलँडवर ३० धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात न्यूजीलँड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षीय संघाच्या सलामीवीर केएल राहुल आणि पृथ्वी शॉने दमदार फलंदाजी करताना १४७ धावांची शतकी भागीदारी रचली. या दोघांनीही अर्धशतके केली. राहुलने ६८ धावा केल्या तर पृथ्वीने ६६ धावा केल्या.

हे दोघे बाद झाल्यावर करुण नायरने ७८ धावा करत संघाला २५० चा टप्पा पार करून दिला. न्यूजीलँडकडून ट्रेंट बोल्टने ३८ धावा देत ५ बळी घेत अध्यक्षीय संघाला ९ बाद २९५ धावांवर रोखले.

न्यूजीलँड संघाची सुरुवात काही खास झाली नाही. न्यूजीलँड संघ २४ धावांवर असतानाच मार्टिन गप्टीलचा धवल कुलकर्णीने बळी घेतला. त्यानंतर मात्र न्यूजीलँडने काही अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या.

न्यूजीलँडकडून कर्णधार केन विलिअमसनने ४७ धावा केल्या तर टॉम लेथमने ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या फलंदाजांना खास काही करता आले नाही.

अध्यक्षीय संघाकडून गोलंदाजीत चांगली कामगिरी झाली. युवा गोलंदाज शाबाज नदीमने आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी ३ बळी घेत न्यूजीलँडच्या फलंदाजीला वेसण घातले. कर्ण शर्मा, गुरकिरत मन, धवल कुलकर्णी आणि आवेश खानला प्रत्येकी एक बळी मिळाले.

न्यूजीलँड संघाने ४७.४ षटकात सर्व बाद २६५ धावा केल्या.

२२ ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका सुरु होणार आहे.