कोहली कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर तर पुजाराची क्रमवारी घसरली !

0 382

आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या फलंदाजी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीची क्रमवारी सुधारली आहे. त्याने ३ स्थानांची प्रगती करत दुसरे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर त्याचा संघ सहकारी चेतेश्वर पुजाराची मात्र क्रमवारीत घसरण होऊन तो दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी आला आहे.

याबरोबरच या फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानी कायम आहे. वनडे आणि टी २० क्रमवारीत अव्वल असणारा विराटचा याही क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. असे झाल्यास त्याला एकाचवेळी क्रिकेटच्या तीनही प्रकारात अव्वल येण्याची संधी असेल.

याआधी असे फक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केले होते. तो २००५-२००६च्या डिसेंबर- जानेवारी महिन्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारात एकाचवेळी अव्वल क्रमांकावर होता.

त्याचबरोबर भारताचा सलामीवीर मुरली विजयच्याही क्रमवारीत प्रगती झाली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे तो आता तीन स्थानांची सुधारणा करत २५ व्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्माने ६ स्थानांची प्रगती केली आहे, तो आता ४० व्या स्थानी आला आहे.

तसेच भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा श्रीलंका कर्णधार दिनेश चंडिमलने पहिल्यांदाच पहिल्या दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने या क्रमवारीत ९वे स्थान मिळवले आहे.

आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाची १ स्थानाने घसरण झाली आहे. तो दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी आला आहे. तसेच आर अश्विन चौथ्या स्थानी कायम आहे. या क्रमवारीत अजूनही इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जिमी अँडरसन अव्वल स्थानी कायम आहे.

तसेच अष्टपैलू क्रमवारीत जडेजा दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र अश्विनची तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

संघ क्रमवारीत भारतीय संघाने १ गुण गमावला असला तरी ते अव्वल स्थानी कायम आहेत. त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका, तिसऱ्या स्थानावर इंग्लंड , चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: