भारतीय संघाचे नागपुरात आगमन, आज केला सराव

नागपूर । भारतीय क्रिकेट संघाचे काल नागपूर शहरात आगमन झाले. पहिला कसोटी सामना ड्रॉ राहिल्यानंतर आज संघ मालिकेतील दुसरा सामना येथील विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर खेळणार आहे.

या आणि दिल्ली कसोटीसाठी हिरवीगार खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी चांगला सराव होऊ शकेल. कोलकाता कसोटीत आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने केवळ १० षटके गोलंदाजी केली.

परवा होणाऱ्या या सामन्यासाठी मुरली विजयने चांगलाच सराव केला आहे. त्याला गेल्या कसोटीतील सलामीवीर शिखर धवनच्या जागी संधी मिळू शकते तर भुवनेश्वर कुमारच्या जागी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारत या मैदानावर ६व्यांदा कसोटी सामना खेळणार असून श्रीलंकेचा या मैदानावरील हा पहिलाच कसोटी सामना असेल.