वाचा: पावसामुळे सराव रद्द झाल्यावर भारतीय संघाने काय केले?

रांची। उद्या पासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी २० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ही मालिका ३ सामन्यांची होणार असून उद्या पहिला सामना रांचीमध्ये खेळवला जाईल. परंतु, या शहरात कालपासून पाऊस पडत आहे आणि त्याचमुळे भारतीय संघाचा सराव रद्द झाला आहे.

भारतीय संघ काल रांचीमध्ये दाखल झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच वनडे मालिका पार पडली त्यात भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत भारतीय संघातील अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते.

भारतीय संघाने त्यामुळे इनडोअर सराव करायलाच प्राधान्य दिले. भारतीय संघाने मैदनामधील लॉबीतच फुटबॉल खेळणे पसंत केले. यात भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी भाग घेतला होता.

पहिल्या टी २० सामन्याच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला

“आम्ही आलो आणि पाऊस सुरु झाला. आम्ही आत्ता काहीही योजना आखल्या नाहीत. आम्ही जसा सराव करू तशी आम्हाला परिस्थितीची कल्पना येईल. पाऊस हा आमच्या हातात नाही. आम्ही विचार करतोय आम्ही काय काय देऊ शकतो. आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.”