मुंबईकर अजिंक्य रहाणेने केले शेतकऱ्यांबद्दल भावनिक आवाहन, पहा व्हिडिओ

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांबद्दल सामाजिक भान ठेवत एक भावनिक अवाहन केले आहे. त्याने आज(12 मार्च) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांच्या कष्टाचा आदर करा असा संदेश दिला आहे.

या व्हिडिओमध्ये रहाणे एका वयस्कर शेतकऱ्याबरोबर उभा आहे. तसेच तो म्हणत आहे की ‘आज आपल्याला ज्या काही फळं-भाज्या मिळत आहेत, ते एका शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आणि त्यांचे आपल्या जीवनामध्ये जे योगदान आहे ते फार महत्त्वाचे आहे.’

‘जे आपण खातो किंवा जे आपल्याला हवे असते ते एक शेतकरी शेतामध्ये मेहनत करतो, त्यामुळे आपल्याला ते मिळते, हे आपण विसरु नये. त्यामुळे मी शेतकरी दादांना धन्यवाद म्हणू इच्छितो, ‘दादा आपले योगदान मोठे आहे’. आपण यापूढे कधीही घरी जेवायला बसू तेव्हा विसरू नका यामागे एका शेतकऱ्याची मेहनत आहे.’

त्याचबरोबर या व्हिडिओला कॅप्शन देताना रहाणेने लिहिले आहे की ‘एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत. #TuesdayThoughts’

रहाणेने याआधी 2015 मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5 लाख रुपयांची देणगी दिली होती.

रहाणे सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेर आहे. तसेच त्याला छोटी दुखापत असल्याने तो सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमधूनही अर्ध्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत मुंबईने सुपर लीग फेरीत धडक मारली होती.

पण त्यानंतर मुंबईला सुपर लीग फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकता आल्याने ब गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात मुंबईला अपयश आले आहे.

अ आणि ब गटातून अनुक्रमे महाराष्ट्र आणि कर्नाटक संघाने अव्वल क्रमांक मिळवत अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल सुरु होण्यापुर्वीच सनरायझर्स हैद्राबादला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू जखमी

आयपीएल २०१९: हा संघ ठरणार विजेता, या दिग्गज माजी खेळाडूने वर्तवला अंदाज

या कारणामुळे कोहलीला सन्मानित करण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट असोसिएशनने केला रद्द