वनडेत किंग ठरलेल्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव !

भारतीय संघाने काल पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७३ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे.

त्यामुळे भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकण्याचाही विक्रम केला आहे. तसेच भारताचा हा द्विपक्षीय मालिकेतील हा सलग ९ वा मालिका विजय ठरला आहे. भारतीय संघाने रचलेल्या अशा विक्रमांमुळे क्रिकेट जगतात त्यांचे चांगलेच कौतुक झाले आहे.

याबरोबरच भारताने आयसीसीने काल जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत त्यांचे अव्वल स्थान पक्के केले आहे. भारत कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानी आहे.

काल पार पडलेल्या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी केली करून भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता. त्याने ११५ धावांची शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल या दोन स्पिनर्सने पाचही सामन्यात उत्तम गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग अशा दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीच्या संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करताना कौतुकही केले आहे.

सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नंबर वन. भारतीय संघाचा मालिका विजय विलक्षण आहे. चहल आणि कुलदीप या दोन्ही स्पिनर्सची कामगिरी प्रभावी होती. रोहितचीही खेळली उत्तम झाली.”

तर सेहवागने म्हटले आहे, “दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिकेत मिळवलेल्या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. तुमचे या मालिकेतील सातत्य आणि भारताबाहेरही विजय मिळवण्याची असणारी भूक ही पुढे येणाऱ्या गोष्टींचेच प्रतीक आहे. हा विशेष संघ आहे.”

भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल लक्ष्मण म्हणाला, “भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. स्पिनर्सची कामगिरी अविश्वसनीय अशी झाली. हा विजय विराट आणि संघासाठी गोड असेल.”

याबरोबरच बाकी खेळाडूंनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.