या ५ भारतीय खेळाडूंची आहेत हॉटेल्स!

खेळाडू म्हणून कारकीर्द घडवत असतानाच भारतीय खेळाडू व्यवसायात देखील कारकीर्द घडवत आहेत. त्यातीलच भारताचे काही नामवंत क्रिकेट खेळाडूंनी हॉटेल हे क्षेत्र निवडून आपला व्यवसाय सुरु केला. असेच हे ५ खेळाडू ज्याची हॉटेल्स आहेत किंवा होती.

सचिन तेंडुलकर:
क्रिकेट जगतात आपल्या खेळाने क्रिकेटचा देव म्हणून नाव कमावलेल्या सचिन तेंडुलकरने त्याचे पहिले हॉटेल २००२ ला हॉटेल क्षेत्रात असणाऱ्या संजय नारंग यांच्या साथीने सुरु केले. त्याने त्याच्या हॉटेलचे नाव ‘तेंडुलकरस्’ असे दिले आहे. हे हॉटेल त्याने मुंबईमध्ये सुरु केले. सचिनने त्याचे दुसरे हॉटेल ‘सचिनस्’ नावाने मुंबईला आणि बंगळुरूला सुरु केले आहे.

सौरव गांगुली:
भारतीय संघात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने त्याचे पहिले हॉटेल २००४ मध्ये एका कंपनीच्या साथीने सुरु केले होते. त्यानंतर दोन वर्षांनी तो या हॉटेलचा पूर्ण वेळचा मालक झाला. त्याच्या हॉटेलचे नाव ‘सौरवस् – द फूड पॅव्हेलियन’ असे दिले होते. चार टप्यात त्याचे हॉटेल्स होते. परंतु, सात वर्षांनीं २०११ ला त्याला त्याचे हॉटेल्स बंद करावे लागले. “सौरव खूप व्यस्त असतो आणि मीही व्यस्त असतो त्यामुळे आम्हाला याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नसल्याने आम्ही हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला” असे सौरव गांगुलीच्या भाऊ स्नेहाशीश गांगुली यांनी आयएएनएसला सांगितले.”

झहीर खान:
बाकीच्या अन्य खेळाडूंपेक्षा झहीरला या क्षेत्रात यश मिळाले आहे. त्याने २००४-०५ ला पुण्यात त्याचे ‘झेडकेज्’ हे हॉटेल चालू केले. त्याने नंतर ‘बँक्वेट फोयर’ हेही विकत घेतले. या व्यवसायाबद्दल तो सांगतो की, “दुखापतींनी मला विचार करायला भाग पाडलं आणि मी या व्यवसायात आलो. नक्कीच क्रिकेट हेच माझ्यासाठी पहिले प्राधान्य आहे आणि पुढेही क्रिकेटलाच प्राधान्य राहील पण मी माझी एक टीम तयार केली आणि गोष्टी आपोआप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. मी व्यवसायातल्या काही गोष्टी लवकर शिकलो.”

वीरेंद्र सेहवाग:
भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही हॉटेल व्यवसाय सुरु केला. त्याने ”सेहवागस् फेवरेट ‘ नावाने शाकाहारी हॉटेल दिल्लीमध्ये चालू केले. परंतु, तो त्याच्या भागीदाराविरुद्ध न्यायालयात गेल्यामुळे त्याला हॉटेल त्याला बंद करावे लागले.

रवींद्र जडेजा:
भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानेही या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याने १२ डिसेंबर २०१२ ला त्याचे पहिले हॉटेल सुरु केले. त्याने ‘जड्डूज् फूड फिल्ड’ या नावाने हॉटेल सुरु केले. १२ हा त्याचा लकी क्रमांक असल्याने त्याने १२ डिसेंबर २०१२ ला सुरु केले. त्याचा जर्सी क्रमांकही १२ आहे. त्याचे हॉटेल राजकोट शहरात असून त्याची बहीण नैना याचे संपूर्ण व्यवस्थापन पाहते. ७ ऑक्टोबर २०१७ रोजी त्याच्या या हॉटेलवर राजकोट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला होता. त्यात न खाण्यायोग्य अनेक पदार्थ मिळाले होते.