भारताच्या या ४ दिग्गज क्रिकेटपटूंचा आहे आज वाढदिवस

आज ६ डिसेंबरला भारताचे ४ खेळाडू आपले वाढदिवस साजरे करणार आहेत. यात रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, आरपी सिंग आणि करूण नायर यांचे आज वाढदिवस आहेत.

रवींद्र जडेजा: भारताचा फिरकीपटू जडेजा आज २९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या तो दिल्लीत सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळत आहे. त्याला या सामन्यात आज सकाळच्या सत्रात एक बळी मिळाला आहे.

जडेजा कसोटीत आयसीसीच्या गोलंदाजी तसेच अष्टपैलू क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत ३४ सामन्यात १६० बळी आणि ११६७ धावा, वनडेत १३६ सामन्यात १५५ बळी आणि १९१४ धावा केल्या आहेत. तसेच ४० टी २० सामन्यात ३१ बळी घेतले आहेत.

या बरोबरच त्याने या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेण्याचाही टप्पा पूर्ण केला आहे.

जसप्रीत बुमराह: जलदगती गोलंदाज असणारा बुमराहचा हा २४ वा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी हा वाढदिवस खास असणार आहे. कारण त्याची दोन दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे.

आयसीसीच्या टी २० गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या बुमराहने आत्तापर्यंत २८ वनडे सामन्यात ५२ बळी घेतले आहेत. तर ३० टी २० सामन्यात ४० बळी घेतले आहेत.

आरपी सिंग: २००७ च्या टी २० विश्वचषकात भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावणारा गोलंदाज आरपी सिंग आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आरपी सिंगने त्याच्या कारकिर्दीत १४ कसोटी सामन्यात ४० बळी, तर ५८ वनडे सामन्यात ६९ बळी घेतले आहेत. तसेच त्याने १० टी २० सामन्यात १५ बळी मिळवले आहेत.

करुण नायर: भारतीय फलंदाज करूण नायरचा आज २६ वा वाढदिवस आहे. नायरने भारताकडून खेळताना इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक केले होते. भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा तो वीरेंद्र सेहवाग नंतरचा दुसराच खेळाडू ठरला.

त्याने आत्तापर्यंत ६ कसोटी सामने आणि २ वनडे सामने खेळले आहेत.