भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन

मुंबई क्रिकेटने आजपर्यंत भारताला जेवढे क्रिकेटपटू दिले असतील तेवढे कदाचितच दुसऱ्या कुठच्या शहराने किंवा राज्याने दिले नसतील. मुंबईची वर्षानुवर्षे खेळण्याची एक विशिष्ट पद्धती अस्तित्वात आहे. फलंदाजीत तिला “Bombay school of batting” असे म्हणतात.

या शाळेतून पदवीधर झालेल्यांमध्ये मांजरेकर, मंकड, सरदेसाई, वेंगसरकर, गावस्कर, मुझुमदार,तेंडुलकर आणि अशीच अजून महान नावे दिसतील. पण ज्यांच्याकडे या शाळेचे founding father म्हणून बघितले जाते ते म्हणजे विजय मर्चन्ट आणि विजय हजारे.

त्यापैकी विजय मर्चन्टचा जन्म १२ ऑक्टोबर या दिवशी झाला. १९११ सालच्या मुंबईत ठाकरसे घराण्यात त्यांचा जन्म झाला. शाळेत आडनाव व वडिलांचा व्यवसाय यात गल्लत होऊन त्यांचे आडनाव मर्चन्ट हेच कायम झाले.

त्याकाळी मुंबईत होणाऱ्या चतुरंगी आणि पंचरंगी (Quadrangular & Pentangular) सामन्यात त्यांनी नाव कमवायला सुरुवात केली. १९३२ला इंग्लंडला जाणाऱ्या पहिल्या दौऱ्यात त्यांची निवड झाली होती. मात्र ब्रिटिशांनी केलेली राजकीय गळचेप न पटल्यामुळे विजय मर्चन्ट त्या दौऱ्यावर गेले नाहीत.

१९३३ला मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी पदार्पण केले. या वेळी ते ६व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आले होते. या दौऱ्यात ते कोणत्याच सामन्यात लगेच बाद झाले नाहीत मात्र मोठी खेळी देखील करता आली नाही. ५४ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

१९३६च्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची वर्णी लागली. खेळायची शास्त्रशुद्ध पद्धत आणि धावा काढण्याची भूक पाहून त्यांना सलामीला पाठवण्यात आले. मँचेस्टरला दुसऱ्या कसोटी सामन्यात मुश्ताक अलीसोबत २०३ धावांची सलामी भागीदारी करत त्यांनी भारताला सुस्थितीत आणून सोडले. मर्चन्ट यांच्या ११४ धावांच्या जोरावर दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

पूर्ण इंग्लिश दौऱ्यावर त्यांनी ५१.३२च्या सरासरीने १७४५ धावा केल्या. याबद्दल त्यांना १९३६ च्या विस्डेन क्रिकेटपटूंच्या माननीय यादीत नाव मिळाले.
त्यानंतर मात्र दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची आंतरराष्टीय कारकीर्द झाकोळून गेली. १९४६ला पुन्हा इंग्लंडविरुद्ध खेळायची संधी त्यांना मिळाली. पूर्ण दौऱ्यावर त्यांनी २३० पेक्षा जास्त धावा केल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यात ओव्हलच्या मैदानावर १२८ धावा करून ते धावचीत झाले. हि त्यांची इंग्लंडमधील शेवटची खेळी होती.

त्यानंतर १९५१ला दिल्लीत इंग्लंडविरुद्ध ते शेवटचा सामना खेळले. यात त्यांनी १५४ धावा केल्या. या खेळीचे वैशिष्टय हे की विजय हजारेंसोबत केलेली २११ धावांची भागीदारी. हजारे १६४ धावा करून नाबाद राहिले.

या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर विजय मर्चन्ट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. केवळ ५ फूट ७ इंच उंच असलेल्या या मूर्तीने क्रिकेटमध्ये विक्रमांचे उंच डोंगर केले. रणजी ट्रॉफी मधील त्यांची सरासरी ९८.७५ अशी आहे. जिच्या सर्वात जवळ आहे तो सचिन तेंडुलकर, ज्याची सरासरी आहे ८५.६२ एवढी. रणजी सामन्यात मर्चन्ट यांची सर्वोच्च खेळी होती ती ३५९ धावांची महाराष्ट्राविरुद्ध.

त्यांची लेटकट आणि त्यांचा तंत्रशुद्ध खेळ हा भारतात सर्वोत्तम समजला जात होता. त्यांना नेटमध्ये ट्रेनिंग करताना पाहणे हेच मुंबईच्या नवोदित फलंदाजांची ट्रेनिंग समजले जाई. अगदी साध्या सामन्यात सुद्धा ते आपली विकेट फेकत नसत. त्यांची खेळण्याची पद्धत हि textbook style होती.

आजही प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांची सरासरी हि जागतिक स्तरावर केवळ सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा कमी आहे. या एका वाक्यातच खेळाडूची महानता कळून जाते.

निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये निवड समितीत महत्वाची भूमिका बजावली. अजित वाडेकरला कर्णधारपद द्यायचा निर्णय त्यांचा होता. पुढे वाडेकरने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौरा जिंकून हा विश्वास सार्थ केला.

विजय मर्चन्ट यांनी उतारवयात बरीच समाजसेवा केली. जॉन अर्लोट या समालोचकाचे रंगभेदाविरुद्ध डोळे उघडण्यात त्यांचा हात होता.
अशा या महान खेळाडूचे निधन २७ ऑक्टोबर १९८७ ला मुंबईत निद्रिस्त अवस्थेत झाले.

कसोटी सामने – १०, डाव – १८, धावा – ८५९, सर्वोच्च – १५४, सरासरी – ४७.७२, ३ शतके, ३ अर्धशतके
प्रथम श्रेणी सामने १५०, डाव – २३४, नाबाद – ४६, धावा – १३४७०, सर्वोच्च – ३५९, सरासरी – ७१.६४, ४५ शतके, ५२ अर्धशतके.

-ओमकार मानकामे