पी व्ही सिंधूने लाँच केले स्वतःचे अधिकृत अॅप

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने काल स्वतःचे अधीकृत अॅप लाँच केले. तिने या अॅप लाँचच्या कार्यक्रमात अॅपबद्दलची अधिक माहिती दिली.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूने मागील काही वर्षात अनेक पदके जिंकण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिचे चाहते भारतात नव्हे जगभरात आहेत.

तिच्या कोर्टवरील खेळण्याच्या शैलीवर भारतातील तसेच जगभरातील अनेक चाहते लक्ष ठेऊन असतात. या चाहत्यांना योग्य माहिती देण्यासाठी तिने ह्या अधिकृत अॅपचे उदघाटन केले आहे.

या अॅपबद्दल माहिती सांगताना ती असे म्हणते, “या अॅपमुळे मला माझ्या चाहत्यांशी अधिक वैयक्तिक स्तरावर सवांद साधण्यास मदत मिळेल. मी विविध सोशल मीडियावर माझ्याबद्दलचे संदेश, कमेंट वाचत असते. आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न पण करत असते परंतु व्यस्त वेळापत्रकातून सातत्याने प्रतिसाद देणे कठीण होते, त्यामुळे या अॅपमधून मला अधिक वैयक्तिक स्तरावर बॅडमिंटन प्रेमींशी जोडण्यास मदत होईल.”

“तसेच मी माझे बालपण, कुटूंब यांच्याविषयी ही बोलणार असून त्यांचे काही फोटो पण शेअर करणार आहे. मी माझे आवडते खाद्यपदार्थ, माझे यश, प्रशिक्षण या बद्दलही चाहत्यांशी बोलणार असून माझी मतेही त्यांच्याशी शेअर करणार आहे.”

सिंधूने यावर्षी सईद मोदी ग्रँड प्रिक्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तसेच ती इंडियन ओपन सुपर सिरीज आणि कोरिया ओपन सुपर सिरीज ही तिने जिंकली असून ति वर्ल्ड चॅम्पियनशिप, दुबई सुपर सिरीज फायनल, हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेमध्ये उपविजेती ठरली आहे.