आयसीसी क्रमवारीत मिताली राज अव्वल

आज आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे क्रमवारीत भारताची कर्णधार मिताली राजने फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या मेग लिंनिंगला दुखापतीमुळे नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला मुकावे लागल्याने तिला तिचे अव्वल स्थानही गमवावे लागले.ती आता या क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे.

फलंदाजीच्या या क्रमवारीत भारताची धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर सहाव्या स्थानी आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी दुसऱ्या आणि न्यूझीलंडची एमी सॅटर्थवेट तिसऱ्या स्थानी आहेत.

त्याचबरोबर गोलंदाजी क्रमवारीत भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी दुसऱ्या स्थानी कायम आहे तर दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज मॅरिझिना कप अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर भारताचे गोलंदाज एकता बिश्त आणि शीखा पांडे अनुक्रमे तेरा व चौदाव्या स्थानी आहेत.

अष्टपैलू क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी अव्वल स्थानी आहे. तसेच या क्रमवारीत भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा सातव्या स्थानी तर झुलन गोस्वामी दहाव्या स्थानी आहे.

संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मागे टाकत अव्वल स्थान पुन्हा पटकावले आहे.तर भारत क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. या क्रमवारीत इंग्लंड दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे.