या भारतीय खेळाडूंचे २०१७मध्ये झाले शुभमंगल सावधान !

२०१७ या वर्षात भारताच्या मोठ्या खेळाडूंची लग्न ही मोठी चर्चेची विषय बनली होती. या वर्षात भारतीय कर्णधार विराट कोहली, माजी गोलंदाज झहीर खान, भुवनेश्वर कुमार आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री या मोठ्या खेळाडूंची लग्न झाली.

विराट कोहली:

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कालच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर या दोघांनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांपर्यंत पोहचवली.

विराटने सध्या सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि २० डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या टी २० मालिकेतून विश्रांती घेतली आहे. विराट आणि अनुष्का यांचा इटलीत कुटूंब आणि जवळचे मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्नसंभारंभ पार पडला.

झहीर खान:

माजी भारतीय जलदगती गोलंदाज झहीर खान आणि चक दे इंडिया फेम सागरिका घाडगे यांनी २३ नोव्हेंबरला मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केले. यानंतर या दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिले होते.

या रिसेप्शनसाठी अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. लग्नाच्या काही महिन्यांपूर्वीच झहीर सागरीकाचा साखरपुडा झाला होता.

भुवनेश्वर कुमार:

भारताच्या या जलदगती गोलंदाजानेही २३ नोव्हेंबरला प्रेयसी नुपूर नागर हिच्याशी विवाह केला. भुवनेश्वरने लग्नसंभारंभासाठी भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतून विश्रांती घेतली होती.

लग्न झाल्यानंतर भुवनेश्वरने दोन वेळा रिसेप्शन आयोजित केले होते. २६ नोव्हेंबर रोजी बुलंदशहरात तर ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे हा सोहळा झाला. सध्या भुवनेश्वर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत आहे.

सुनील छेत्री:

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री देखील ४ डिसेंबरला कोलकातामध्ये त्याची प्रेयसी सोनम भट्टाचार्य हिच्याशी विवाहबद्ध झाला. त्याच्या लग्नसभारंभाला अनेक माजी फुटबॉलपटूंनी हजेरी लावली होती.

सध्या सुनील हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये बंगळुरू एफसीकडून खेळत आहे. त्याच्या लग्नाचे रिसेप्शन २४ डिसेंबरला बंगळुरूला होणार आहे.