भारतीय संघ आणि आयसीसीच्या स्पर्धा, एक नवं नातं

पूर्वी आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धा म्हटलं की कायम काही ठरलेल्या गोष्टी पुढे येत. त्यात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकणार, दक्षिण आफ्रिका किंवा न्युझीलँड उपांत्यफेरीत पराभूत होणार किंवा इंग्लंड ज्यांनी या खेळाचा शोध लावला त्यांना या स्पर्धेत कोणतही विशेष यश मिळणार नाही.

परंतु २००७ सालापासून यात बराच बदल होत गेला आणि गेल्या १०-१२ वर्षांत या स्पर्धा गाजविणारा कोणता संघ असेल तर तो भारत असं एक नवं समीकरण पुढे आलं.

१९८३ साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारताला त्याच प्रकारातील विश्वचषक जिंकायला तब्बल २८ वर्ष लागले. परंतु मधल्या काळात भारतीय संघाने आयसीसीच्या तब्बल ४ स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यात दोन पराभव, एक विजय तर एक विजेतेपद श्रीलंकेबरोबर विभागून अशी भारताची कामगिरी राहिली.

२००० सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत न्युझीलँडकडून पराभूत झाला तर २००२ साली भारताने हे विजेतेपद श्रीलंकेबरोबर वाटून घेतले. २००३ ला ५० षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव ऑस्ट्रेलियाने केला. तर भारताने नवख्या एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकात विजय मिळविला.

२०११ साली भारताने भारतातच ५० षटकांच्या विश्वचषकात श्रीलंकेला पराभूत करत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळविले. तर २०१३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केले. २०१४ साली बांगलादेशने आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकात मात्र २०११ च्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा श्रीलंकेने काढला आणि भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.

या वर्षी भारताने बांगलादेशला पराभूत करून चौथ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वीच्या चारही स्पर्धांत ज्यात भारत अंतिम फेरीत गेला त्यात एमएस धोनीने नेतृत्व केले होते. यावेळी भारताचा संघ प्रथमच दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहचला असून पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.
भारताची आयसीसीच्या स्पर्धांमधील अंतिम फेरीतील कामगिरी
१९८३: ६० षटकांचा विश्वचषक, विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज
२०००: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, पराभूत विरुद्ध न्युझीलँड
२००२: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, विजेतेपद भारत श्रीलंकेला विभागून
२००३: ५० षटकांचा विश्वचषक, पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२००७: २० षटकांचा विश्वचषक, विजयी विरुद्ध पाकिस्तान
२०११: ५० षटकांचा विश्वचषक, विजयी विरुद्ध श्रीलंका
२०१३: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, विजयी विरुद्ध इंग्लंड
२०१४: २० षटकांचा विश्वचषक, पराभूत विरुद्ध श्रीलंका
२०१७: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, निकाल बाकी