आशिया कप: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय

मलेशियात चालू असलेल्या महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने आज सलग दुसरा विजय नोंदवला आहे. त्यांनी आज थायलंडला 66 धावांनी पराभूत केले. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

भारताने या सामन्यात थायलंडसमोर 133 धावांचे अव्हान ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना थायलंडला 20 षटकात 8 बाद 66 धावाच करता आल्या.

थायलंडकडून नारुओमोल चाइवाई(14), नताया बोकोथाम(21) आणि चनिडा सथिरुआंग(12) यांनीच थोडीफार लढत दिली. या व्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दोनआकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने 3 षटकात 11 धावा देत 3 विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला. तसेच भारताकडून दिप्ती शर्माने 2 तर पुजा वस्त्राकर आणि पुनम यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 132 धावा केल्या होत्या. भारताची सुरवात मोना मेश्राम आणि स्म्रीती मानधनाने चांगली केली होती. या दोघींनी 53 धावांची सलामी भागिदारी रचली.

या दोघींनंतर अनुजा पाटील आणि हरमनप्रीतने चांगली फटकेबाजी केली. मात्र आज वेदा कृष्णमुर्तीला खास काही करता आले नाही ती 11 धावांवर बाद झाली. अखेरच्या षटकात अनुजा बाद झाल्याने पुजा वस्त्राकरला फलंदाजीसाठी यावे लागले. तीने 2 चेंडूत 6 धावा फटकावत भारताला 132 धावसंख्या गाठून दिली.

थायलंडकडून वोन्गपाका लींगप्रसर्टने 2, रतनापोर्न पॅडग्लैरड आणि नताया बोकोथामने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक:

भारत: 4  बाद 132 धावा (20 षटके)

(भारत: मोना मेश्राम 32 धावा, हरमनप्रीत कौर 27*धावा; थायलंड: वाँगपॅक लीगप्रसार – 2/16)

थायलंड: 8 बाद 66 धावा (20 षटके)

(थायलंड: नताया बोकोथाम 21 धावा; भारत: हरमनप्रीत कौर – 3/11, दिप्ती शर्मा – 2/16)