मिताली राजच्या संघाचे जंगी स्वागत !

मुंबई, २६ जुलै : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील स्फूर्तिदायी मोहिमेनंतर काल भारतात परतला. विमानतळावर आगमन झाल्यानंतर संघाचे चाहत्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे.

भारतीय संघाने २०१७च्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेते पद मिळवले आहे. यजमान इंग्लडकडून त्यांना अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली.

आयसीसी स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटूंनी अप्रतिम खेळ करून लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मने जिंकली आहेत. याचीच एकप्रकारे परतफेड म्हणजे चाहत्यांनी संघाचे केलेले हे जंगी स्वागत.

भारतीय खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महिला क्रिकेटपटू छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच चाहत्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले. काही चाहते सेल्फी घेत होते तर काही ऑटोग्राफ मागत होते.

महिला क्रिकेटपटूंसाठी हे सर्व नवीन आहे. या आधी भारतीय चाहत्यांचे एवढे प्रेम फक्त पुरुष क्रिकेटपटूंना विशेष करून मिळत असे.