भारतीय महिला क्रिकेट संघाचा नवा विश्वविक्रम

सध्या इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु असलेला महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. २३ जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर यजमान इंग्लंड संघाविरुद्ध भारताचा अंतिम सामनाहोणार आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात धडक मारण्यात भारत यशस्वी झाला.

या विजयासोबतच भारतीय महिला संघाने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला, पहिल्या म्हणजेच ओपनिंग सामन्यात इंग्लंडला आणि ग्रुप स्टेजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला भारताने पराभवाची धूळ चारली आहे. हे तीनही संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या तीन स्थानावर आहेत. आयसीसी क्रमवारीत पहिल्या ३ स्थानावर असणाऱ्या संघांना एकाच विश्वचषकात पराभूत करणारा भारत हा पहिला संघ बनला आहे.

तसेच या विजयाबरोबर विश्वचषकाची अंतिम फेरी दुसऱ्यांदा गाठण्यात भारताला यश मिळाले आहे. यापूर्वी २००५ साली भारत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभूत झाला होता.