मोठा विजय मिळवत भारतीय महिला हॉकी संघाची दक्षिण कोरियावर ३-१ विजयी आघाडी

आज भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरिया विरुद्ध चौथ्या सामन्यात ३-१ च्या फरकाने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेतही ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

आज भारताच्या खेळाडूंनी चांगला खेळ करताना द. कोरियावर पूर्णपणे वर्चस्व ठेवले होते. भारताकडून गुरजीत कौर, दीपिका आणि पूनम राणी यांनी गोल केले. तर द. कोरियाकडून मु ह्युन पार्कने एकमेव गोल केला.

भारताने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला होता. या पेनल्टी कॉर्नरवर गुरजीतने गोल करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पहिले सत्र संपायला १ मिनिट बाकी असताना भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यावर दीपिकाने गोल करून भारताची आघाडी वाढवली.

या सत्रात ४ थ्या आणि १० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर द. कोरियाला गोल करण्याची संधी होती पण भारताची गोलकीपर स्वातीने चांगली गोलकिपिंग करत द कोरियाला गोल करण्यापासून रोखले.

यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात दोन्ही संघाच्या डिफेंडर्स खेळाडूंनी चांगली कामगिरी करत एकही गोल होऊ दिला नाही.

मात्र चौथ्या सत्राच्या सुरवातीलाच ४७ व्या मिनिटाला वंदना कटारियाच्या कौशल्यपूर्ण पासवर पूनमने मैदानी गोल करून भारताची आघाडी भक्कम केली. त्यानंतर चौथे सत्र संपण्यासाठी ३ मिनिटे बाकी असताना ५७ व्या मिनिटाला मी ह्युन पार्कने द. कोरियाकडून गोल करून त्यांचा सामन्यातील व्हाईटवॉश टाळला.

द. कोरिया विरुद्ध भारत संघाचा पुढील शेवटचा सामना रविवारी होणार आहे.