एशियन गेम्स: कबड्डीत ७ वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताला इराणकडून पराभवाचा धक्का!

इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये कबड्डीच्या उपांत्य फेरीत 7 वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारताचा इराणने 18-27 असा धक्कादायक पराभव केला आहे.

यामुळे आता भारताला 1990 नंतर पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

भारताने या सामन्यात सुरुवातीच्या आठ मिनिटातच 6-0 अशी आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर इराणने भारताला कडवी लढत देण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून न पाहता शेवटपर्यंत गुण मिळवले.

मात्र भारताच्या बाबतीत बचाव तसेच चढाई अशा दोन्ही क्षेत्रात खेळाडूंना सहज गुण घेण्यात अपयश येत होते. पहिल्या सत्रात भारत आणि इराणला विजयाची समान संधी होती. त्यावेळी त्यांचे गुणही 9-9 असे बरोबरीत होते.

पण दुसऱ्या सत्रात इराणने चांगला बचाव करत सामन्यात वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. इराणच्या अबोझल आणि फझल अत्रचलीने भारताची चढाई कमकुवत केली.

भारताचे स्टार चढाईपटू राहुल चौधरी, परदिप नरवाल, मोनू गोयत, रिशांक देवाडिगा आणि कर्णधार अजय ठाकूर यांनाही यशस्वी चढाई करण्यात अपयश येत होते.

सामन्याच्या 24 व्या मिनिटाला इराणचे बचावपटू फझल आणि माग्सोधोलूने भारताचा कर्णधार अजयला सुपर टॅकल केले. पण याचवेळी अजयच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला काही काळ बाहेर बसावे लागले.

परंतू तो सामना संपण्यास 3 मिनिटे बाकी असताना पुन्हा खेळायला आला. पण तोपर्यंत इराणने भक्कम आघाडी मिळवली होती.

त्याचबरोबर या सामन्यात चांगली सुरुवात केलेल्या भारताच्या संदिप नरवाल, गिरीश इरनाक आणि मोहित चिल्लर या बचाव फळीकडूनही खास कामगिरी झाली नाही.

सामना संपण्यास 4 मिनिटे बाकी असताना इराणने भारताला आॅल आऊट करत भारताच्या आत्मविश्वासाला तडा दिला. त्यानंतर मात्र भारताच्या पुनरागमनाच्या आशा धूसर झाल्या. अखेर इराणने भारतावर मात करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे.

इराण एशियन गेम्स 2018च्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाविरुद्ध खेळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: वुशू प्रकारात भारताला चार कांस्यपदक

एशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक